कोल्हापुरात महापालिका शाळेत साकारली स्मार्ट हॅपी क्लासरुम
schedule04 Dec 25 person by visibility 49 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती संचलित गोविंदराव पानसरे विद्यालयात शहरातील पहिल्या स्मार्ट हॅपी ई-क्लासरूमचे उद्घाटन उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु झाला. आयडीबीआय बँकेच्या आर्थिक सहयोगातून हॅपी क्लासरूमची निर्मिती शक्य झाली आहे.
प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी बोलताना शाळा स्मार्ट होत असताना विद्यार्थ्यांचा आनंद, आत्मविश्वास आणि सक्रिय सहभाग वाढवणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध उपक्रम आधीपासूनच राबविण्यात येत होते. त्यात आता अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत स्मार्ट हॅपी ई-क्लास सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम शिक्षण प्रक्रियेला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करत उपायुक्त धनवाडे यांनी शाळेच्या टीमचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत लक्षणीय वाढ होण्यासाठी हा क्लास उपयुक्त ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.इंटरॲक्टिव्ह बोर्डद्वारे विद्यार्थी आनंदाने, लक्ष केंद्रित करून शिकू लागले आहेत. या पद्धतीमुळे अध्ययन अधिक प्रभावी होते, कोणताही विद्यार्थी मागे राहत नाही, निश्चित कौशल्ये विकसित होण्यास मदत होते, विद्यार्थ्यांमध्ये अचूकता वाढते, शिकणे आनंददायी झाल्याने उपस्थितीत वाढ होते यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मोठी चालना मिळते. गायत्री देवळेकर व लोचन देसाई यांनी स्वागत केले. शामराव सरगर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, आयडीबीआय बँकेचे अधिकारी संदीप माकोडे, शाखाप्रमुख प्रदीप एगडे, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, चंद्रकांत कुंभार, मुख्याध्यापिका विमल जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आपटेकर, शांताराम सुतार, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सुधाकर सावंत, राजेंद्र पाटील, सुभाष माने उपस्थित होते.