दिव्यांग दिन ठरला अनोखा, अंध शिक्षिका दिपाली पाटीलला नियुकतीचे पत्र
schedule03 Dec 25 person by visibility 15 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी दृष्टीहीन दिव्यांग असलेल्या दिपाली पाटील यांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. दरम्यान दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या प्रयत्नातून नियुक्ती प्रक्रियेला गती मिळाली. जिल्हा परिषद प्रशासन दोन दिवस पाठपुरावा करत होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना कांबळे यांनी केले. त्यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क, अधिनियम, छळ-हिंसाचार प्रतिबंध, शासन निर्णय, तसेच संस्था नोंदणी व देखरेख याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली.
कर्णबधीर विद्यालय कागलचे विशेष शिक्षक संतोष गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अन्वये संवेदनशीलता, जागृती, सुगम्यता सेवा व पायाभूत सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदावर रुजू झालेल्या दिपाली पाटील यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शेंडकर यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी अधिनियम २०१६ च्या अंमलबजावणीमुळे ही नियुक्ती शक्य झाल्याचे मत श्रीमती शेंडकर यांनी व्यक्त केले. श्रीमती सावंत यांनी सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. रुपाली सलगर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन दाभाडे, प्रमोद भिसे, अर्चना माने, विशाल असोदे, हेमंत कांबळे, रोहित शिंगे, आनंदा दळवी व बनसोडे यांनी केले.
…………….
“ मी २०२४ पासून यासाठी प्रयत्न करत होते, मला पुणे येथील ससून रुग्णालयामधून कागदपत्र मिळण्यास विलंब झाला. मात्र याबाबत स्वतः सचिव महोदयांनी यात लक्ष देत मदत केली. त्यामुळे हे शक्य झाले. त्यांचे आणि कोल्हापूर प्रशासनाचे मी मनापासून आभार मानते. ”
- दीपाली पाटील