मतदार कोल्हापूरचे, नाव पुणे-बार्शीच्या मतदार यादीत, हा घोळ कधी सुधारणार ? : आदिल फरासांचा प्रशासनाला सवाल
schedule03 Dec 25 person by visibility 26 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुंषगाने प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये प्रचंड चुका आहेत. दुसऱ्या प्रभागातील मतदारांच्या नावांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक बारामधील ज्या मतदारांनी विधानसभेला कोल्हापुरात मतदान केले होते, त्यांची नावे बार्शी आणि खडकवासला पुणे येथील मतदार यादीत समाविष्ठ आहेत. इतका मोठा घोळ होतो कसा ? या चुकांमध्ये दुरुस्ती कधी होणार ? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी केला आहे.
महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी बीएलओ घरोघरी जाऊन मतदार यादीतील घोळ दुरुस्त करतील असे सांगितले असले तरी बीएलओ प्रभागात फिरताना दिसत नाहीत. महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली असता चुका दुरुस्त करण्याऐवजी चालढकल सुरू आहे. प्रभाग क्रमांक बारामध्ये दुसऱ्या प्रभागातील जवळपास ४५०० मतदारांची नावे समाविष्ठ आहेत. प्रभाग क्रमांक बाराची लोकसंख्या २६५०० असताना मतदारसंख्या ३० हजारापर्यंत कशी पोहोचली ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मतदार यादीतील घोळ दुरुस्तीचा विषय प्रशासनाने गांभीर्याने घेतला नाही. निवडणूक यंत्रणा, सक्षम दिसत नाही. प्रभाग क्रमांक बारामध्ये इतर प्रभागातील मतदारांची नावे समाविष्ठ असल्याच्या तक्रारी करुनही दुरुस्ती झाली नाही हे त्यांनी निदर्शनास आणले. प्रभाग क्रमांक बारामधील मतदार असिया अलिम बारगीर,बिलकश शब्बीर बागवान, आयेशा गुलाम साबिर मोमीन, हसीना मुबारक मोमीन यांनी विधानसभेला मतदान केले आहे. मात्र आता त्यांची नावे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मतदार यादीत समाविष्ठ दिसतात. कसबा बावडा येथील मतदार जेबा दस्तगीर मुल्ला यांचे नाव खडकवासला पुणे येथील मतदार यादीत आहे. हा घोळ कधी सुधारणार असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.