राहुल गांधींच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेनेचे आंदोलन
schedule14 Sep 24 person by visibility 292 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणसंबंधी केलेल्या वक्तव्याचा कोल्हापुरात शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी, जोडे मारो आंदोलन केले. राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
कोल्हापूर महापालिका परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ आंदोलन झाले. शिवसेना कार्यकर्त्यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो घोषणा दिल्या. याप्रसंगी बोलताना क्षीरसागर म्हणाले, ‘देशातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने कायमच संविधानाचा आदर केला आहे. परंतु, कॉंग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यात भारतीय आरक्षणाबाबत वक्तव्य करून एक प्रकारे भारतीय लोकशाही आणि संविधानाचा अवमान केला आहे. राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका जगजाहीर झाली. त्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला. त्यांचा हा खोटा प्रचार आणि दुटप्पी भूमिका देशातील जनता उघड्या डोळ्याने पाहत असून पुढच्या काळात अशा दुटप्पी आणि फसव्या प्रवृत्तींना जनता योग्य धडा शिकवेल.’
आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, अमरजा पाटील, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, पूजा शिंदे, पूजा कामते, सुनिता भोपळे, प्रीती अतिग्रे, राधिका पारखे, पूजा आरदांडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाडगे, अॅड.अमोल माने, दीपक चव्हाण, सुनील जाधव, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, अर्जुन आंबी, विजय जाधव, सनी अतिग्रे, कपिल नाळे, विकास शिरगावे, कुणाल शिंदे, आकाश सांगावकर उपस्थित होते.