शरद पवारांनी टोचले साखर कारखानदारांचे कान, कारखान्यांनी कामगारांचे ६०० कोटी थकवले
schedule18 Sep 25 person by visibility 36 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :महाराष्ट्रात कारखानदारी क्षेत्रात काही वर्षापूर्वी सहकारी कारखान्याचा मोठा दबदबा होता. एकूण कारखान्यापैकी तब्बल ७० टक्के कारखाने सहकारी होते. गेल्या काही वर्षात ही संख्या ५० टक्क्यांवर आली. अनेक कारखान्यांनी कामगारांच्या हिताविरोधात धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. १३५ कारखान्यांनी कामगारांचे ६०० कोटी थकवले आहेत. काही कारखान्यात तर ४० टक्के कामगार कंत्राटी आहेत, हे काही चांगले चित्र नाही. साखर कारखाना व्यवस्थापनांनी याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे.’अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी साखर कारखानदारांचे कान टोचले.
पवार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी इथेनॉल धोरणाला काही घटकांकडून विरोध होत असल्याचे म्हटल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणले. त्यावर बोलताना पवार यांनी, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या धोरणामुळे इथेनॉल उत्पादकांना बळकटी मिळत आहे. त्या धोरणाचा फायदा शेतकऱ्यांनाही होत आहे. तेव्हा इथेनॉल धोरणाला विरोध होत असेल असे मला वाटत नाही. शिवाय सध्याच्या काळात साखर कारखाने टिकायचे असतील तर फक्त साखर उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही. कारखान्यांनी कारखान्यांची उपपदार्थांची निर्मिती करायला पाहिजे. कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारावी.’ असे मत मांडले.
‘ राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयाकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शेतकरी, सरकारच्या मदतीकडे नजरा लावून आहेत.’असे पवार म्हणाले. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाचे जाहीरात करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगाविताना पवार म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जशी मदत केले, त्या कामाचे मुख्यमत्र्यांनी अनुकरण करावे.’‘मराठा आणि ओबीसी आरक्षण वादातून सामाजिक एकोप्याची वीण उसवत आहे. हे महाराष्ट्रासाठी घातक आहे.राज्य सरकारने या दोन्ही घटकांत समन्वय घडवून आणला पाहिजे.’असे आवाहन त्यांनी केले.
वयाच्या ७५ वर्षानंतरही मी राजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातून निवृत्ती घ्या असे सांगण्याचा मला नैतिक अधिकार पोहोचत नाही.’असेही पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने कारभारात पारदर्शकता आणली नाही तर निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास कमी होत जाईल. तेव्हा निवडणूक आयोगाने पारदर्शक कामकाज करावा असे मत ही त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, मदन कारंडे, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर, बाजीराव खाडे, अनिल घाटगे, सुनील देसाई, गणेश जाधव आदी उपस्थित होते.