मराठी भाषा असेपर्यंत मृत्युंजय वाचकप्रिय राहिल - जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule18 Sep 25 person by visibility 15 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत कर्णकथा सांगणारी मृत्युंजय कादंबरी वाचकप्रिय राहिल.’ अशा भावना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केल्या.
‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनी अक्षर दालन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात गुरूवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रवींद्रनाथ जोशी आणि अमेय जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले.
कार्तिकेयन म्हणाले, सावंत हे जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम शाळेमध्ये टायपिंगचे प्रशिक्षक हाेते हे ऐकून मला अभिमान वाटला. ‘छावा’ चित्रपटामुळे त्यांची देशभर ख्याती झाली.
प्रास्ताविकात समीर देशपांडे म्हणाले, आजऱ्यासारख्या गावात कोणतीही साहित्यीक परंपरा नसलेल्या घरामध्ये सावंत यांचा जन्म झाला. अभ्यास, वाचन, चिंतन, मनन याच्या बळावर सावंत यांनी वाचकांना खिळवून ठेवणारे असे शब्दवैभव निर्माण केले. या कार्यक्रमाला राम देशपांडे, प्राचार्य जी. पी. माळी, सौम्या तिरोडकर, विश्वास सुतार, प्रा. दीपक जोशी,अरविंद राणे, कल्पना सावंत संजीवनी देशपांडे, स्नेहल कामत यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.