कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रम
schedule17 Sep 25 person by visibility 74 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे शाही दसरा महोत्सव नवरात्र कालावधीदरम्यान आयोजित करण्यात येतो. यंदा २२ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान आयोजित शाही दसरा महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवाणी असणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिल्पकला, चित्रकला, निबंध, रांगोळी इत्यादी स्पर्धा, तरुणाईच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी रील्स स्पर्धा, महिलांची बाइक रॅली, साहसी खेळ प्रकार- पारंपरिक होड्यांची शर्यत, नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन, समाज प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनास चालना देण्यासाठी परिसंवाद इत्यादी भरगच्च कार्यक्रम आहेत.पर्यटकांना व सामान्य नागरिकांना कोल्हापूरचे वैशिष्ट्य असणाऱ्या चित्रनगरीची सफर आयोजित करण्यात आलेली आहे. कोल्हापुरी संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासाठी मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाभर पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पारंपरिक पोशाख व वेशभूषा परिधान करून कोल्हापूरचे वैशिष्ट्य असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी खाद्य संस्कृती यांची माहिती देणारे कार्यक्रम आहेत.
२२ सप्टेंबर रोजी दसरा महोत्सवाचे उद्घाटन दसरा चौक येथील मैदानात होणार आहे. एकूण पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवात शातील दहा राज्यांमधील प्रसिद्ध लोककला व लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध कलाकारांचे समूह कोल्हापूरात येणार आहेत. कोल्हापूरच्या नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. प्रसिद्ध कलाकार व शाहिर रामानंद उगले यांचा ‘पंचगंगा तीरी आम्ही कोल्हापूरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच यावर्षी कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका व स्वराज्यरक्षिता छत्रपती महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जयंती वर्ष असल्याने त्यांच्या जीवनावर व कर्तृत्वावर आधारित असे ‘भद्रकाली ताराराणी’ महानाट्य २४ सप्टेंबर रोजी आहे. महोत्सवात नागरिक, भाविक व पर्यटकांनी कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.