लेकीचं सोनपाऊली स्वागत ! सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना अंगठी प्रदान !!
schedule18 Sep 25 person by visibility 49 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांनी अनोखा सामाजिक उपक्रम राबविला. सरकारी रुग्णालयात १६ सप्टेंबरला रात्री १२ नंतर ते १७ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत या कालावधीत जन्मलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींना खासदार महाडिक यांच्यावतीने सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात जन्मलेल्या नऊ मुलींना सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मंत्री शेलार यांनी, ‘सरकारी रूग्णालयात जन्मलेल्या मुलींना खासदार धनंजय महाडिक यांनी सोन्याची अंगठी देण्याचा राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.’असे गौरवोद्गगार काढले. दरम्यान सीपीआरसह कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण ४२ मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली.
स्वस्थ नारी-सशक्त परिवार अभियांतर्गत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलींचा सन्मान करण्याचा उपक्रम खासदार महाडिक यांनी राबवला आहे. मुलींचा वाढदिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी पंतप्रधान मोदींच्या वाढदिनी जन्मलेल्या मुलींच्या पालकांना चंदनाची दोन रोपे दिली जाणार आहेत. या रोपांचे १८ वर्षानंतर ५० लाख रुपये मिळतील आणि त्यातून तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च पार पडेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबन्नावर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. गिरीष कांबळे, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, समाजसेवा अधिक्षक शशिकांत रावळ उपस्थित होते.