टोप-संभापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी उद्योग उभारणीला प्राधान्य द्या-माजी आमदार जयश्री जाधव
schedule17 Sep 25 person by visibility 22 categoryउद्योग

कोल्हापूर : संभापूर औद्योगिक वसाहत येथे रस्ते, वीज पाणी आदी प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेत. यामुळे उद्योजकांनी येथे उद्योग उभारणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा व माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. ही एमआयडीसी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास माजी आमदार जाधव यांनी व्यक्त केला.
येथील वाय. पी. पोवारनगरमधील उद्यम सांस्कृतिक सभागृहात कोल्हापूर उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी माजी आमदार जाधव अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विषय पत्रिकेमधील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
माजी आमदार जाधव म्हणाल्या, कोल्हापूरचा औद्योगिक विकास झाला पाहिजे आणि येथील उद्योजक सक्षम बनला पाहिजे या उद्देशाने कोल्हापूर उद्यम सोसायटी काम करीत आहे. लघु उद्योजक सभासदांना औद्योगिक कारणासाठी जागा पुरविणे, लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन देणे हा उद्यम सोसायटीचा मुख्य हेतू आहे. यानुसारच टोप संभापूर येथे सोसायटीच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. येथील विजेचा प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित होता.वीज वितरण कंपनीकडून औद्योगिक वसाहतीमध्ये सबस्टेशन उभारणीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या निधी मंजूर करून आणला. औद्योगिक वसाहत मधील कच्चे रस्ते आणि घुणकी ते संभापूर येथील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. संभापूर येथील पाण्याची टाकी व जल शुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.
सभेला उपाध्यक्ष सुधाकर सुतार, संचालक राजन सातपुते, चंद्रकांत चोरगे, हिंदुराव कामते, अशोक जाधव, संजय अंगडी, अतुल आरवाडे, आनंद पेंडसे, संजय थोरवत, अविनाश कांबळे, अमर कारंडे, संगीता नलवडे यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद व उद्योजक कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष सुधाकर सुतार यांनी आभार मानले.