गौरव समितीतर्फे सतेज पाटील यांचा मंगळवारी सत्कार
schedule20 Nov 23 person by visibility 288 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना कार्यान्वित झाल्याबद्दल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा मंगळवारी, (२१ नोव्हेंबर २०२३) सर्वपक्षीय गौरव समितीतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती गौरव समितीचे निमंत्रक सचिन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. दसरा चौकात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शेकाप, भाकप मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
थेट पाइपलाइन योजनेसाठी आमदार पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोल्हापूर शहराला शुद्ध व मुबलक स्वरुपात पाणी पुरवठा व्हावा म्हणून गेल्या चार दशकाहून अधिक काळ कोल्हापूरकर संघर्ष करत आहेत. या योजनेच्या मंजुरीपासून ते पाणी पुरवठापर्यंत आमदार पाटील यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून सर्वपक्षीय गौरव समितीतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी थेट पाइपलाइन योजनेसाठी योगदान विविध संघटना, संस्था व व्यक्ती मिळून ५० जणांचा सत्कार करण्यात येणार आहे. असे माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, कॉम्रेड दिलीप पवार, सतीश कांबळे यांनी सांगितले. विविध पक्षाचे नेते मंडळी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत असे मोहन सालपे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, एस. बी. पाटील, प्रदीप चव्हाण, अरुण कदम, संध्या घोटणे, भारती पोवार, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, संजय पोवार वाईकर, संभाजी जगदाळे, किशोर खानविलकर आदी उपस्थित होते.