मार्केट सेस विरोधातील चार ऑगस्टच्या परिषदेस प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधींचा सहभाग
schedule16 Jul 26 person by visibility 12 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधात चार ऑगस्ट रोजी कोल्हापूरात होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रतिनिधी उपस्थित राहून सरकारला व्यापाऱ्यांच्या एकतेची ताकद दाखवून देऊया असे आवाहन चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रा, इंडस्ट्री अँड ट्रेड, मुंबईचे चेअरमन मोहन गुरनानी यांनी ऑनलाईन झालेल्या सभेत केले.
सभेस कोल्हापूर, मुंबई, सांगली, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर येथील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष व कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, मार्केट सेस विरोधात महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी एकत्र येण्यासाठी कोल्हापूरात परिषद आयोजित केली आहे. सरकार व्यापाऱ्यांवर वेगवेगळ्या रुपाने कर आकारत असते. राज्य सरकारचे व्यापाऱ्यांबाबतचे धोरण निश्चित असावे. मार्केट सेससोबत व्यवसाय कर देखील रद्द व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी परिषद कोल्हापूरात घेणेचा उद्देश सांगितला. कॅमिट व कोल्हापूर चेंबरचे सचिव अजित कोठारी यांनी परिषदेच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व मार्केट सेस विरोधात कोल्हापूर चेंबर व कॅमिट नेहमीच व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच,ग्रेन, राईस अँड ऑईल सीडस् मर्चंटस् असोसिएशन (ग्रोमा), मुंबईचे भिमजी भानूशाली, नागपूरचे रमेश उमाठे. नाशिकचे प्रफुल्ल संचेती, दि बारामती मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किरवे. दि जनरल किराणा मर्चंट असोसिएशन, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष निलेश सेठी, सोलापूरचे सुरेश चिक्कळी यांनी चर्चेत सहभाग घेतला. जोपर्यंत मार्केट सेस हटत नाही तोपर्यंत दर दोन महिन्याला प्रत्येक जिल्ह्यात परिषद घेऊन सरकारला आपली ताकद दाखवून देवू असे सांगितले.जालन्याचे दामोदर बजाज, सोलापूरचे मोहन कोनकटी यांनी देखील मार्केट सेस विरोधात रोष व्यक्त करत त्यांच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने व्यापारी प्रतिनिधी आणण्याचे आश्वासन दिले.