रुग्णांना दिलासा ! महापालिका रुग्णालयात जेनेरिक मेडिकल !!
schedule26 Sep 23 person by visibility 449 categoryमहानगरपालिका

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : सरकारी दवाखान्यामध्ये माफत दरात उपचार होतात, पण अनेकदा औषधे बाहेरुन आणावी लागतात. औषधांचा खर्च हा सामान्य लोकांना परवडत नाही. नेमकी हीच गरज ओळखून गरीब रुग्णांना माफक दरामध्ये औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालय परिसरात जेनेरिक मेडिकल सुरू होणार आहेत. नॅकॉप इंडिया लिमिटेड या संस्थेची ही औषधी दुकाने असणार आहेत. त्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नियंत्रण असणार आहे. महापालिका स्तरावर व रुग्णालय स्तरावर अशा दोन समित्या स्थापन केल्या आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची तीन आंतररुग्णालये आहेत. यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल आणि आयसोलेशन हॉस्पिटलचा समावेश आहे. याशिवाय अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत. नॅकॉप इंडिया लिमिटेड या संस्थेने अमृत स्टोअर्सच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्यास जागा उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती केली आहे. त्या अंतर्गत राज्यातील नगरविकास विभागातंर्गत स्थानिक स्वराज्य नागरी संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या परिसरात जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्यासंबंधी आदेश मिळाले आहेत. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रुग्णालय परिसरात औषधी दुकाने सुरू करण्यासंबंधी महापालिका स्तरावर समिती स्थापन केली आहे.
अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका स्तरावरील समिती नेमली आहे. या समितीत आठ सदस्य आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा हे सदस्य सचिव आहेत. तरसदस्य म्हणून सहायक संचालक नगररचना विभाग, शहर अभियंता, उपशहर अभियंता (सर्व), इस्टेट ऑफिसर, परवाना विभाग अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभागाकडील प्रतिनिधी आहेत.
या समितीला नॅकॉप संस्थेला जेनेरिक औषधी दुकानासाठी जागा निश्चिती, जागेचा भाडेपट्टा, भाडेपट्टाचा कालावधी निश्चितीचे अधिकार आहेत. शिवाय सहा महिन्यातून एकदा बैठक घेऊन आढावा घ्यायचा आहे. तसेच महापालिका रुग्णालय स्तरावर उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी हे उपसमितीचे अध्यक्ष आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी, मुख्य औषध भांडार विभागातील मिश्रक हे सदस्य असतींल.
या उपसमितीने दर तीन महिन्याला औषधी दुकानाच्या कामकाजाचा आढावा घेऊन अहवाल सादर करावयाचा आहे. औषध दुकानातील खरेदी विक्रीसाठी किमान तीन रजिस्टर्ड औषध निर्मात्यांची नेमणूक करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे औषधांची विक्री करताना नॅशनल फार्मस्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीच्या नियमाप्रमाणे किंमतीचे पालन करावे लागणार आहे. भारत सरकारच्या जन औषधी धोरणानुसार हा सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
…………………………..
“नगरविकास विभागाच्या आदेशानुसार महापालिका स्तरावर समित्यांची स्थापना झाली आहे. नॅकॉप कंपनीने रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधी दुकाने सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासंबंधी विनंती केली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. या रुग्णालयावर देखरेख आरोग्य विभागाचे असणार आहे. योग्य किंमतीत औषधे उपलब्ध करुन देतात की नाही हे तपासले जाईल.”
-डॉ. प्रकाश पावरा, मुख्य आरोग्य अधिकारी महापालिका