
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज 1 : स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो की लोकसभा-विधानसभेची ! प्रत्येक ठिकाणी पाटील आणि महाडिक गटात निकराचा राजकीय संघर्ष. एकमेकांवर कुरघोडी, शह-काटशह देण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाटील आणि महाडिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे शड्डू घुमू लागले आहेत.आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय, आता कंडका पाडायचं’असे जाहीर करत महाडिकांना आव्हान दिले आहे. पाटील यांचे आव्हान परतावून लावताना माजी आमदार अमल महाडिक यांनी ‘सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायंच’असे जोरदार उत्तर पाटलांना दिले आहे.
राजाराम साखर कारखान्यासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आरोप, प्रत्यारोपांची सलामी झाली. वास्तविक राजाराम साखर कारखान्यावर गेली २७ वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक याची सत्ता आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र साडे सात तालुक्याचे. १२२ गावांचे. सभासद संख्या १३५०० च्या आसपास. जवळपास तीन दशके या कारखान्याचा कारभार करताना महाडिक यांनी सभासदांचा विश्वास कायम राखला आहे. सभासदांना वेळेत ऊस बिले, कामगारांचा वेळेवर पगार करत कारखान्याचे उत्तम व्यवस्थापन टिकवून ठेवल्याचे सत्ताधारी मंडळ सांगतात. तर विरोधी आघाडीचे इतर कारखान्यापेक्षा राजाराम साखर कारखान्याच्या कमी ऊस दर व कारखान्यावरील महाडिकांच्या एकहाती वर्चस्वाकडे लक्ष वेधत आहेत.
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीही पॅनेलची बांधणी केली. गेल्या वेळी चांगली लढत दिली. मात्र सत्ताधारी महाडिक आघाडीने सत्ता कायम राखली आहे. गेल्या पाच-सात वर्षात कारखान्याचे नेतृत्व माजी आमदार अमल महाडिक हेच करत आहेत. कारखान्याचे विस्तारीकरणे, को जनरेशन प्रकल्प प्रस्तावित आहेत. इथेनॉल प्रकल्प, डिस्टलरी प्रकल्प उभारणी यासाठी महाडिक यांनी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे महाडिकांच्या येथील सत्तेला हादरे देण्यासाठी आमदार पाटील हे गेल्या काही वर्षापासून व्यूहरचना आखत आहेत. यातून कारखान्याच्या १८०० सभासदांचा पात्रतेचा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचला. सभासद पात्रतेची लढाई अंतिमत: महाडिक गटांनी जिंकली. आता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटील आणि महाडिक गटात एकमेकांच्या उखाळयापाकाळया काढल्या जात आहेत. एकमेकांवर दोषारोप ठेवले जात आहेत. पाटील यांनी राजाराम कारखान्यावरुन महाडिक यांच्यावर तोफ डागली. पाटील यांच्या आरोपांची तोफ निकामी करताना महाडिक यांनी डॉ. डी.वाय. पाटील साखर कारखान्यातील पाटील यांच्या एकाधिकारशाहीवर हल्ला चढविला.
दुसरीकडे आमदार पाटील यांनी ‘आमचं ठरलंय, कंडका पाडायचा’अशी घोषणा देत आपला इरादा स्पष्ट केला. दरम्यान पाटील यांच्या घोषणेलाही माजी आमदार अमल महाडिक यांनी तितक्याच ताकतीने ‘सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय’या टॅगलाइनमधून प्रतिउत्तर दिले. नजीकच्या काळात राजाराम कारखान्याचा आखाडा आणखी गााजणार आहे. राज्य आणि जिल्ह्यातील राजकारणाची बदलती स्थिती, सुप्रीम कोर्टाचा १८०० सभासदांसंबंधी दिलेला निर्णय महाडिक गटासाठी जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे आमदार सतेज पाटील हे राजकीय डावपेचात माहीर आहेत. यामुळे राजाराम कारखान्याचे मैदान कोण मारणार हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.