सांगलीतील प्रशासन चषक क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता
schedule22 Sep 25 person by visibility 119 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी : सांगली जिल्हास्तरीय विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पोलीस विभाग विजेता ठरला. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून विविध खात्यांचे अधिकारी कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजातून विरंगुळा मिळावा या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते झाला. विविध विभागांच्या सोळा संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते करण्यात आली होती. शनिवार व रविवार अशा सुट्टीच्या दिवशी या स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. रविवारी 21 सप्टेंबर 2025 रोजी उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने पार पडले. उपांत्य फेरीत पोलीस विभाग, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, वैद्यकीय महाविद्यालय मिरज व कृषी विभाग या संघाने प्रवेश केला होता. अंतिम सामना पोलीस विभाग व महावितरण यांच्यात झाला.
प्रथम फलंदाजी करत पाच षटकात महावितरणने 55 धावांचा टप्पा पार केला. प्रतिउत्तरादाखल पोलीस संघाने तीन षटके एक चेंडूत 58 धावा काढून 11 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकून प्रथम क्रमांकाच्या प्रशासन चषकावर आपले नाव कोरले. महावितरण संघास द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा कार्यकारी अधिकारी नरेश सावंत आणि क्रीडा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.