प्रशासनाकडून तारीख पे तारीख ! संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम कासवगतीने !!
schedule25 Apr 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. प्रशासनाकडून केवळ तारीख पे तारीख दिल्या जातात. प्रशासनाने केवळ तारखाची घोषणा न करता नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम त्वरित करावे अशी मागणी बी वार्ड अन्याय निवारण कृती समितीने केली आहे.
नाट्यगृहाच्या नूतनीकरणात होत असणारा विलंब हा रंगकर्मीबरोबरच कोल्हापूरच्या जनतेला वेदनादायी तसेच संतापजनक ठरणारा आहे. नाट्यगृहातील बाहेरच्या परिसरातील कामे संपूर्णपणे ठप्प असून, नाट्यगृहाच्या आतील भागाचे नूतनीकरण अर्धवट अवस्थेत आहे.
अतिशय संथपणाने काम चालू असल्यामुळे एक वर्षात हे नाट्यगृह पूर्ण होईल अशी प्रशासनाची घोषणा ही निव्वळ वल्गना ठरली आहे.
सध्या चालू असणाऱ्या कामांचा वेग पाहता नाट्यगृहाचे काम गतीने होणे गरजेचे आहे कारण पावसाळा तोंडावर आला आहे.
स्वच्छतागृह, पार्किंगची सुविधा आणि त्याचबरोबर अंतर्गत सजावटीची कामे या कामांबाबतीत नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची कोणतीही प्रगती झालेली नाही.
एक वर्षात पूर्ण होणारे नूतनीकरण दोन वर्षे पूर्ण होत आली तरी अतिशय संथपणाने सुरूच आहे. प्रशासनाने सप्टेंबर २०२५ ही पहिली तारीख सांगितली. त्यानंतर नोव्हेंबर २०२५, त्यानंतर २७ मार्च २०२६ अशा पद्धतीने प्रशासन तारीख पे तारीख देत आहे. नुकत्याच झालेल्या रंगकर्मी आणि प्रशासनाच्या बैठकीत ३० जून २०२६ ही नवीन तारीख देण्यात आली आहे. परंतु बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने पाहणी केल्यानुसार कामाने गती घेतली नाही तर हे नूतनीकरण रखडून अजून वर्षभर तरी नाट्यगृह खुले होणार नाही अशी परिस्थिती आहे.
कोल्हापूर महापालिका प्रशासनाने गतीने या नाट्यगृहाच्या कामांची त्वरित पूर्तता करावी अन्यथा बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीला
जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारि कृती समितीचे संस्थापक किसनराव कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी, राजेश पार्टे, नितीन शेळके, मुसाभाई शेख, सतीश पोवार, प्रशांत डकरे, दीपक म्हेतर,प्रशांत बरगे, किरण भोसले, सुनील हंकारे यांनी दिला आहे.