ज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, गोकुळच्या घडामोडीवरुन भैया मानेंनी डिवचले
schedule23 Apr 26 person by visibility 50 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळच्या घडामोडीवरुन मंत्री हसन मुश्रीफ यांची कोंडी झाली अशा बातम्या येत आहेत. ज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, अशी काही मंडळी अशा प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. त्याबद्दल तुम्ही विचलित होऊ नका. संताप व्यक्त करू नका. चिंता करू नका. मंत्री मुश्रीफ हे ३० ते ३५ वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अशा अनेक संघर्षांना, अनेक वादळांना फार मोठ्या शांततेने, संयमाने आणि विधायक कामाने तोंड देऊन ती परतवूनही लावलेली आहेत. आत्ता तर मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे कसल्याही संकटांचा सामना ते धीरोदात्तपणाने करतील. ’ असे पत्रक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांनी काढले आहे.
माने यांनी पत्रकांत म्हटले आहे, ‘गोकुळ दूध संघाची होऊ घातलेली निवडणूक, वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू असलेल्या न्यायालयीन आणि प्रशासकीय सुनावण्या या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व घटक मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही.आता चालू असलेल्या गोकुळच्या घडामोडीमध्ये रोज सहाय्यक निबंधक- दुग्ध यांची बदली, सहाय्यक निबंधक- दुग्ध यांची बदली रद्द, ११०० अंतरीम अवसायनातील दुध संस्थांची सुनावणी, अंतरीम अवसायानात गेलेल्या दूध संस्थांच्या सुनावणीचा निकाल, उर्वरित अंतरिम अवसायानात गेलेल्या संस्थांच्या पुढील तारखा, उच्च न्यायालयात असलेल्या अनेक तारखा, नवीन कायदा मंजूर झाल्यामुळे प्रशासक येणार का? अशा सगळ्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व घटक मित्रपक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत.
त्या अस्वस्थतेतूनच अनेकवेळा आमच्याकडे विचारणा करतात. तुम्हाला विनंती करतो की, कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत यासंबंधी अनेकवेळा चर्चा केलेली आहे. चर्चेतून चांगलाच तोडगा निघेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये, मग ती निवडणूक कधीही लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घटक मित्रपक्षांच्या महायुतीचीच सत्ता येईल. ’