सुनावणीस विलंब, प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक ! सहायक निबंधक कार्यालयावर धडक !!
schedule24 Apr 26 person by visibility 81 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :अवसायन प्रक्रियेतील प्राथमिक दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी या मागणीसाठी प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींनी , शुक्रवारी (२४ एप्रिल २०२६) दुपारी एकत्र येत निबंधक दुग्ध विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. कोणत्याही संस्थेला मतदानापासून वंचित ठेवू नका. सुनावणी प्रक्रियेत वारंवार अडथळे आणण्यामागे राजकीय दबाव आहे का ? असा सवालही दूध संस्था प्रतिनिधींनी केला.तसेच सुनावणीच्या प्रक्रियेवरून प्रश्नांची सरबती केली. " सुनावणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, प्रसंगी दुग्ध विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू. दुग्ध विभागाच्या कामकाजाला राजकीय वास येत आहे. मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडला तर तो खपवून जाणार नाही" असा इशारा दूध संस्था प्रतिनिधी व राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर यांनी दिला आहे.
दुग्ध विभागाचे सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी, ‘सहकार कायद्यातील नियमानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. सुनावणीला विलंब होण्यात कसलाही राजकीय दबाव नाही’असे स्पष्ट केले. सध्या सहायक निबंधक कार्यालयातील अवसायन प्रक्रियेतील प्राथमिक दूध संस्थांची सुनावणी सुरू आहे. सात एप्रिलपासून या सुनावण्या सुरू होत्या. दरम्यान १६ एप्रिल रोजी तत्कालिन सहायक निबंधक सुजय कदम यांची बदली करण्यात आली.त्या जागेवर कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे सुनावणी प्रक्रियेत खंड पडला आहे. जाणीवपूर्वक सरकारी पातळीवरुन सुनावणीची प्रक्रिया लांबविण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक तालुक्यातील संस्थाना अद्याप नोटिसा लागू केल्या नाहीत. अवसायनात ढकलण्याचा हेतूपरस्पर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी दूध संस्था प्रतिनिधींनी केला.
प्राथमिक दूध संस्थेचे प्रतिनिधी विकास पाटील कुरुकली, बाजार समितीचे संचालक शेखर देसाई, युवराज पाटील (बामणी), राजेखान जमादार (मुरगुड), दत्तात्रय पाटील (केनवडे), राजू जाधव (बेनिग्रे), संजय कलिकते (शिरगाव), निवास पाटील (गिरोली), के. बी. पाटील (पोहाळे), बाबासो रणसिंग (आरळे), नानासो पाटील (शेळेवाडी), विश्वास पाटील (ठिपकुरली), अरविंद खामकर (खामकरवाडी), संतोष पाटील (वाघवडे), परशुराम जाधव (शाहूवाडी), गोरख शिंदे (सोनवडे), संदीप केमाडे (सैदापूर), सागर पाटील (पुंगाव), किरण पिष्टे (मौजे सांगाव), एस. के. जाधव (वागवे), विश्वास इंगवले (हातकणंगले), विजय कोटकर, विठठल जाधव, राजेंद्र जाधव, डॉ. सुनील चौगले, शरद नरके, प्रकाश भिऊंगडे, रघुनाथ आवळे आदींचा सहभाग होता.
......................
“ प्राथमिक दूध संस्थांच्या सुनावण्या तत्काळ व वेळबद्ध पद्धतीने पूर्ण कराव्यात. संबंधित संस्थांना तत्काळ सुनावणीच्या नोटीसा लागू कराव्यात.गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तत्काळ चालू करावी.सुनावणी प्रक्रिये पारदर्शकता ठेवून कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खात्री करावी.कोर्टात सादर करण्यात येणारी माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असावी. अन्यथा प्राथमिक दूध संस्थांच्यावतीने कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल.’’
- विकास पाटील कुरुकलीकर