पाच कोटी रुपयांच्या बक्षीसाचे पंचायतराज अभियान हे देशातील एकमेव-जयकुमार गोरे
schedule15 Sep 25 person by visibility 50 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गाव समृद्ध आणि विकासाला गती मिळण्यासाठी लोकसहभागातून आणि लोकचळवळीतूनच खरा बदल घडेल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रत्येक गावाने सहभाग नोंदवून बक्षिसासाठी नव्हे, तर गावाच्या विकासासाठी काम करावे, पाच कोटी रुपये बक्षीस देणारे हे देशातील एकमेव अभियान आहे. प्रत्येक गाव समृद्ध झाले, तर राज्यही समृद्ध होईल.’ असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
कोल्हापूर येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राहूल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर आयुक्त नितीन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, गावातील विकास प्रक्रियेला बळ देणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील मंजूर घरकुलांच्या बांधकामातील अडचणी सोडवून येत्या २६ जानेवारी रोजी ५० हजार लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात येतील. समृद्ध शाळांसाठी ७८ कोटी रुपये, तर पुढील कालावधीसाठी 600 कोटी रुपये मंजूर झाले असून, समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
कार्यशाळेत प्रारंभी जिल्हास्तरीय आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण झाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वाचन साहित्याचे प्रकाशन, डॉ. कलशेट्टी यांच्या ‘मी विकास यात्री’ पुस्तकाचे प्रकाशन, ‘सुंदर माझे घरकुल’ स्पर्धेची घोषणा आणि ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या ११० ग्रामविकास योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रास्ताविकात अभियानाची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सतरा सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची पूर्वतयारी एक ऑगस्ट २०२५ पासून सुरू आहे. व्यासपीठावर ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले आदी उपस्थित होते.