आरोग्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर डॉ. राजकुमार पाटील
schedule14 Sep 23 person by visibility 438 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील जगदगुरू पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीच्या होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या व्यवस्थापन परिषदेवर बहुमताने निवड झाली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची २०२३- २०२८ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.
याशिवाय अश्विनी रूरल वैद्यकिय महाविद्यालय सोलापूरचे डॉ. सचिन मुंबरे आणि सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिकचे डॉ. मिलींद आवरे यांचीही व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली. निवड झालेल्या सदस्यांचे मा. कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), मा. प्रति कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांनी अभिनंदन केले.
राज्यातील ४७५ वैद्यकिय,डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर वैद्यकिय क्षेत्रांशी निगडीत असलेली महाविद्यालये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर व कोल्हापूर ही विभागीय केंद्र कार्यान्वीत आहेत. विभागीय केंद्र कोल्हापूरसाठी येत्या ५ वर्षात ३ ते ४ एकर शासकीय जमीन उपलब्ध करण्यासाठी पाठपूरावा करणे व राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे नावे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय कोल्हापूरमध्ये सुरू करण्याचा मानस डॉ. राजकुमार पाटील यांनी व्यक्त केला. डॉ. पाटील यांनी याच महाविद्यालयातून पदवी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, शाहू इन्स्टिटयूटमधून रुग्णालय व्यवस्थापनाची पदविका घेतली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून संशोधनपर लेख प्रसिध्द झाले आहेत. सध्या ते महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबईचे माजी अध्यक्ष आहेत.