कागलात दोन उमेदवारांची माघार, मुश्रीफांच्या स्नुषा बिनविरोध
schedule19 Nov 25 person by visibility 38 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या अनपेक्षित आघाडीनंतर कागल नगरपालिका निवडणुकीत बुधवारी प्रभाग क्रमांक नऊमधील दोन उमेदवारांनी माघार घेतली. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासह अन्य एका उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू व माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची नगरसेविकापदी बिनविरोध निवड झाली. सेहरनिदा मुश्रीफ या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. कागल नगरपालिका निवडणुकीत यंदा, मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची आघाडी आहे. या आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून येत पालिकेत खाते खोलले.
मुश्रीफ व घाटगे यांच्या आघाडीवर माजी खासदार संजय मंडलिक यांनी टीकास्त्र सोडले होते. तसेच कागल नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासह 23 नगरसेवकपदावर शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे लढणार अशी घोषणा केली होती. मंडलिक यांनी घोषणा करुन चोवीस तास उलटण्याअगोदरच प्रभाग क्रमांक नऊमधील शिवसेनेचा उमेदवार व अन्य एकाने माघार घेतली. प्रभाग क्रमांक नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नूरजहाँ निसार नायकवडी व अपक्ष उमेदवार मोहबतबी अब्दुलरशीद शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सध्या उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी, नायकवडी व शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सेहरनिदा मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची आतषबाजी केली.