भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांची फेरनिवड ! कोल्हापूर महानगर वेटिंगवर !!
schedule13 May 25 person by visibility 78 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील व हातकणंगले ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची फेरनिवड करण्यात आली. प्रदेश भाजप तर्फे राज्यातील 58 जिल्हाध्यक्षांची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाली. उर्वरित जिल्हाध्यक्ष व महानगर जिल्हाध्यक्षांच्या निवडीची घोषणा दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा व्हायची आहे.
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील निवडणुका गेल्या महिन्याभर सुरू होत्या. पहिल्यांदा मंडल अध्यक्षांची निवडी झाल्या. त्यानंतर जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्षपदासाठी इच्छुकानी नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नाथाजी पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन संघटनात्मक काम करण्यावर भर दिला आहे. यापूर्वी जुलै 2023 मध्ये त्यांच्याकडे भाजपा कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
दुसरीकडे हातकणंगले ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती. सध्याचे अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांच्या कामकाजाविषयी संघटनात्मक पातळीवर काही तक्रारी केल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्याकडे त्यासंबंधी तक्रारी केल्या आहेत. यामुळे या ठिकाणी संधी कोणाला दिली जाणार याविषयी उत्सुकता होती. दरम्यान पक्षाने पुन्हा एकदा राजवर्धन निंबाळकर यांच्यावर जबाबदारी सोपवली. निंबाळकर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. सभागृहात त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे करत छाप उमटवली होती. कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष कोणाला मिळणार याविषयीही उत्सुकता आहे. महानगर अध्यक्ष विजय जाधव यांनी नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक काम केले आहे. साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत आहे. त्यांनाही अध्यक्ष म्हणून यापूर्वी कमी कालावधी मिळाला आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या फेरनिवडी झाल्यामुळे कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी जाधव यांची निवड होऊ शकते अशी शक्यता भाजप वर्तुळातून व्यक्त होत आहे. महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाराणी निकम यांची नावे ही चर्चा आहेत. अजित ठाणेकर यांनी यापूर्वी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे त्यांच्याकडे प्रवक्ते पद होते. तर महिला आघाडीचे अध्यक्ष रुपाराणी निकम यांनी महापालिकेत अभ्यासू नगरसेविका म्हणून छाप उमटवली होती. पक्षाच्या विविध कार्यक्रमाच्या सहभागी असतात.