महात्मा बसवण्णांच्या वचनात मराठीतील प्रबोधन परंपरेचे मूळ – प्राचार्य राजेखान शानेदिवाण
schedule11 May 25 person by visibility 87 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महात्मा बसवण्णांच्या वचनात मराठीतील प्रबोधन परंपरेचे मूळ विचार आहेत. समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुता हे त्यांचे विचार कार्य स्वीकारुन त्या पद्धतीने आचरण केल्यास समाजात माणूस धर्म वाढीस लागेल.’असे विचार प्राचार्य राजेखान शानेदिवाण यांनी व्यक्त केले.
लेखक व शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विश्वास सुतार लिखित ‘महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन समारंभ रविवारी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन डॉ. शानेदिवाण बोलत होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. व्याख्याते व मुख्याध्यापक एम. आर. पाटील हे प्रमुख वक्ते तर महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरला पाटील, प्रकाशन अनिल म्हमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. निर्मिती प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.तर ज्ञानसंवर्धन प्रकाशनतर्फे प्रकाशित खलीलवाणी या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
डॉ. विश्वनाथ मगदूम म्हणाले, ‘भगवान गौतम बुध्दानंतर सामाजिक क्रांतीचे कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले. त्यांच्या वचनात मानवतावाद आहे. मात्र भाषिक वाद आणि जात-धर्माच्या चौकटीत अडकवून त्यांच्यावर अन्याय झाला. महाराष्ट्रात २१ वर्षे त्यांचे कार्य होते. महात्मा बसवण्णा यांना व्यापक पद्धतीने समजून घेतले पाहिजे.’
व्याख्याते व मुख्याध्यापक एम. आर. पाटील यांनी, ‘सध्याच्या कालखंडात माणूस माणसापासून तुटत आहे. भौतिकवादाकडे झुकत आहे. माणूस मारला जात आहे. रक्तपात दिसतो, पण मारणाऱ्याचे हात दिसत नाहीत. अशा स्थितीत माणूसपणाची विखुरलेली माळ गुंफण्याची ताकत बसवेश्वरांच्या वचनात आहे.’ सरला पाटील यांनी, ‘महात्मा बसवेश्वरांची मानवतावादी वचने ही समाजाला प्रेरक आहेत.’असे नमूद केले. लेखक डॉ. विश्वास सुतार यांनी ग्रंथ लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. महात्मा बसवण्णा यांचे ऐतिहासिक कार्यकर्तृत्व व जीवन संघर्ष मांडणारा, जातीअंताची भूमिका घेऊन मानवतावाद जोपासणारा आणि त्यांच्या मानवी मूल्यांची आधुनिकता प्रस्तुत करणारा हा ग्रंथ असल्याचे स्पष्ट केले.
प्रकाशक अनिल म्हमाणे यांनी प्रास्ताविक केले. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास तरटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला राजशेखर तंबाखे, विलास आंबोळे, प्राचार्य प्रवीण चौगुले, प्रा. टी.के. सरगर, डॉ. गिरीश मोरे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव कांबळे, शिक्षक अशोक पाटील, विजय एकशिंगे, शिक्षिका लक्ष्मी बाजीराव पाटील, शर्मिला अपराध, जॉर्ज क्रूझ, ॲड. करुणा विमल, मिलिंद यादव, प्रकाशक अमेय जोशी, ज्ञानेश्वर भेलोंडे आदी उपस्थित होते.