महापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !
schedule23 Jan 26 person by visibility 96 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीनंतर साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर आणि उपमहापौर निवडी आता पुढील आठवडयात होणार आहेत. नगरविकास विभागाकडून महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर निवडीच्या कार्यक्रमाची प्राथमिक रुपरेषा जाहीर केली आहे. ३० किंवा ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत महापौर व उपमहापौर निवडीसाठी नगरसेवकांची बैठक घ्यावी असे सुचविले आहे. ३१ जानेवारी रोजी शनिवार असल्यामुळे तीस जानेवारी, शुक्रवारी महापौर व उपमहापौर निवड होऊ शकते. दरम्यान यासंदर्भातील अधिकृत कार्यक्रम विभागीय आयुक्त जाहीर करतात. निवड सभेचे अध्यक्ष तथा पीठासन अधिकारी व तारीख विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर होते. कोल्हापूर महापालिका प्रशासनाने, विभागीय आयुक्तांकडून महापौर निवडीची तारीख व वेळ मिळावी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्या संबंधीचा प्रस्ताव शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. पंधरा जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान झाले. सोळा जानेवारीला मतमोजणी झाली. त्यानंतर उत्सुकता लागली आहे ती, महापौर व उपमहापौर निवडीकडे. नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक रुपरेषानुसार २७ किंवा २८ जानेवारी रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांनी अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारी २०२६ रोजी महापालिकेत नगरसेवकांची सभा घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात येणार आहे.