माणगावचे महावीर मगदूम यांना जीवनगौरव पुरस्कार
schedule27 May 23 person by visibility 619 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक महावीर बाबू मगदूम यांचा शनिवारी (२७ मे) जैन समाज व माणगांव ग्रामस्थांच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. महावीर मगदूम हे माणगाव येथील दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आतापर्यंतच्या कार्याच्या गौरवार्थ जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
माणगाव येथील बाबू आप्पाराया मगदूम व वेणू मगदूम यांच्या पोटी महावीर मगदूम यांचा जन्म २१ मे १९४२ रोजी झाला. महावीर मगदूम हे बालपणापासून शांत व संयमी वृत्तीचे. त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण कुमार विद्यामंदिर माणगाव येथे तर आठवी व नववीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थच्या रुकडी येथील शाळेत घेतले. १० वी ते ११ वी पर्यंत शिक्षण माणगांव हायस्कूल येथे झाले. ११ वी नंतर आयटीआय शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. गुरुजी शांतीकुमार पाटील गुरुजी यांची
प्रेरणा व गुरूदेव समंतभद्र महाराज यांच्या मार्गदर्शनात टेक्निकल विभागात शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. ३४ वर्षे सेवा केली. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावाजले. इचलकरंजी येथील कुडचे कुटूंबातील मंगल कुडचे यांच्याशी त्यांचा १६ जून १९७६ रोजी विवाह. त्यांना चंद्रकांत व राजू ही दोन मुले. त्यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. चंद्रकांत यांना व्यवसायात तर राजू यांना सहकार, शिक्षण समाजकारण, राजकारणात नावलौकिक मिळवला आहे. राजू मगदूम हे माणगावच्या सरपंचपदी आहेत.
दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक महावीर मगदूम यांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात रस घेतला. दिगंबर जैन समाज माणगांवच्या अध्यक्षपदाची धुरा वाहिली. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यागी निवास, मानस्तंभ, किर्तीस्तंभ, जिनमंदीरचे नूतनीकरण, पंचकल्याण पूजा, निशीदी येथे विहीर व त्यांचे बांधकाम, वीर सेवा दल व वीर महिला मंडळ यांचे सबलीकरण अशा समाजोपयोगी कार्यात पुढाकार घेतला. त्यांच्या ८१ वर्षापूर्तीनिमित्त जैन समाज व माणगांव ग्रामस्थांच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता दिगंबर जैन समाज पांडूशिला, कन्या शाळासमोर माणगाव येथे कार्यक्रम होत आहे.