गोकुळमध्ये महाराष्ट्र दिन - कामगार दिन साजरा
schedule02 May 23 person by visibility 332 categoryउद्योग

श्रमातून संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगार वर्गाने अधिकाधिक सजग होण्याची गरज- कॉम्रेड प्रसाद कुलकर्णी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कामगार संघटना आणि संघ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ प्रकल्प येथे १ मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कॉम्रेड प्रसाद कुलकर्णी म्हणाले," महाराष्ट्राला सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेच्या लढ्याची आणि समतेची उज्वल परंपरा आहे. आज महाराष्ट्राला सर्वार्थाने महान बनवण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.त्यासाठी लोकशक्तीचा रेटा वापरला पाहिजे .तसेच जागतिक कामगार दिन साजरा करत असताना जागतिक संदर्भ लक्षात घेऊन भारतीय कामगार चळवळीच्या स्थापणे पासून अनेक व्यक्तींनी आणि विविध कामगार संघटनांनी कामगारांच्या मागण्यांबाबत जो आवाज उठवला तो आज पुन्हा बुलंद करण्याची नितांत गरज आहे. आपल्या श्रमातून संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगार वर्गाने अधिकाधिक सजग होण्याची गरज आहे."
संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्हणाले,"गोकुळच्या वाटचालीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोलाचे आहे. व कामगार दिनाच्या व महाराष्ट् दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी गोडबोले यांच्या हस्ते कॉम्रेड कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. शाहीर सदाशिव निकम यांनी प्रास्ताविक केले. आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी , हिमांशू कापडिया, लक्ष्मण पाटील, मल्हार पाटील, विश्वास पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते