महापालिका स्तरावरील सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलचे वर्चस्व
schedule16 Jul 26 person by visibility 10 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापालिका स्तरावरील सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेतील विजयी, उपविजयी आणि तृतीय क्रमांकाच्या संघांना राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै.अवधूत राजेंद्र घारगे यांच्या स्मरणार्थ अवधूत घारगे फाउंडेशनतर्फे आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल विजेता ठरला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघावर ३-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकाविले.
या बक्षीस वितरण समारंभास महानगरपालिका क्रीडा समितीचे सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, महाराष्ट्र हायस्कूलचे प्राचार्य एस. ए. जाधव, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे सचिव प्रदीप साळोखे व क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण उपस्थित होते.
पहिल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र हायस्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा ४-० असा दणदणीत पराभव केला. महाराष्ट्रकडून केदार भोसले, प्रज्वल कवडे, वेदांत नलवडे आणि श्लोक जाधव यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघाने पोदार स्कूलवर २-१ अशी मात केली. शाहूकडून श्रीजीत माळी आणि अर्जुन देवकर यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर पोदारकडून सूर्यांश पाटीलने एक गोल नोंदवला. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पोदार स्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलवर १-० असा विजय मिळविला. पोदारकडून ॲशली डायसने निर्णायक गोल केला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघावर ३-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. वेदांत नलवडे याने दोन, तर अभिजीत आडुळकर याने एक गोल केला. विजेत्या महाराष्ट्र हायस्कूल संघात सोहम चिले, आराध्य चौगुले, आर्यन पवार, कौस्तुभ सोनाळे, रणवीर पाटील, केदार भोसले, प्रज्वल कवडे, वेदांत नलवडे, श्लोक जाधव, अभिजीत आडुळकर, अथर्व चव्हाण, समर्थ पवार, वेधवर्धन सुतार, वेदांत चव्हाण, अनुज बंदरे आणि पार्थ बुचडे यांचा समावेश होता. संघाच्या यशासाठी क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही. एस. पाटील, शरद मेढे, शुभम मुसळे आणि संतोष पोवार यांनी मार्गदर्शन केले.
१७ वर्षांखालील स्पर्धा....
सेंट झेविअर्स हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) संघाचा १-० असा पराभव केला. सेंट झेविअर्सकडून ज्ञानेश्वरी खोत हिने विजयी गोल केला. छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघाने भाई माधवराव बागल हायस्कूलवर १-० असा विजय मिळविला. शाहू कडून मिताली भोईटे हिने निर्णायक गोल नोंदवला. विद्यापीठ हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलचा १-० असा पराभव केला. विद्यापीठ हायस्कूलकडून विभव निकम याने एकमेव गोल केला. कोल्हापूर पब्लिक स्कूल आणि साई इंग्लिश मीडियम स्कूल, जरगनगर यांच्यातील सामना ०-० असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या ट्रायब्रेकरमध्ये कोल्हापूर पब्लिक स्कूलने ३-२ अशा फरकाने विजय मिळविला. महावीर इंग्लिश स्कूलने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, संभाजीनगरचा १-० असा पराभव केला. महावीरकडून वीरवर्धन पाटील याने विजयी गोल केला.