महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वसामान्यांसाठी काम करणारे - सतेज पाटील
schedule05 Jan 26 person by visibility 155 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ सर्वसामान्य लोकांची कामे करणाऱ्या उमेदवारांना नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवा. महाविकास आघाडीने सामान्य माणसांसाठी काम करणारी चांगली माणसे उमेदवार म्हणून दिले आहेत. त्यांना निवडून देऊन शहराच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी व्हा.’ असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सातमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी, (पाच जानेवारी २०२५ ) आयोजित केले होते. कुंभार गल्ली येथे हा कार्यक्रम झाला. दरम्यान प्रभाग क्रमांक सातमध्ये काँग्रेसकडून सर्वसाधारण महिला गटातून उमा शिवानंद बनछोडे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून नितीन ब्रह्मपुरे, सर्वसाधारण महिला गटातून सुप्रिया साळोखे, सर्वसाधारण गटातून राजेंद्र जाधव हे उमेदवार आहेत. कार्यालयाचे उद्घाटन झाल्यांनतर उमेदवारांनी भागातून प्रचार फेरी काढली.
याप्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीतर्फे सात जानेवारी रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले. गेल्या सभागृहात बाजारगेट प्रभागातून निवडून आलेल्या उमा बनछोडे यांनी प्रभागात चांगली कामे केली आहेत असे नमूद करुन आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीने सामान्य लोकांसाठी काम करणारी माणसे उमेदवार म्हणून दिली आहेत. त्यांना निवडून द्या.असे आवाहन केले. भाजप, शिवसेनेकडे गेली तीन वर्षे सत्ता आहे, मग कोल्हापूर खड्डेमुक्त का झाले नाही ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी माजी महापौर मारुतराव कातवरे, मनोहर पाडळकर, गोपीशेठ मणेर, किशोर पाडळकर, उमाजी कातवरे, प्रसाद ब्रह्मपुरे, लक्ष्मीकांत वडगावकर, शिवाजी वडणगेकर, सुनील जाधव, पोपट मुरगुडे, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, शिवानंद बनछोडे यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.