भाषणबाजीत हरवला सिनेटमधील प्रश्नोत्तराचा तास ! मूळ विषयापेक्षा अवांतर चर्चा जास्त ! !
schedule20 Dec 25 person by visibility 142 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शनिवारी (२० डिसेंबर २०२५) झालेल्या अधिसभेत प्रश्नोत्तराचा तास हा भाषणबाजी, मूळ विषयापेक्षा अवांतर चर्चा आणि उपप्रश्नांच्या वाढलेल्या यादीमध्ये हरवला. प्रश्नोत्तराच्या साठ मिनिटात केवळ तीनच प्रश्न सभागृहासमोर आले. परीक्षेतील गैरप्रकार, बैठे पथक, मान्यता काढून घेतलेली परीक्षा केंद्रे आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी परीक्षापूर्व प्रयोगशाळा तपासणी असे महत्वाचे विषय सदस्यांनी उपस्थित केले होते. मात्र कोणत्याच प्रश्नावर ठोस उत्तर मिळाल्याचे समाधान काही सदस्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही. एकदा तर ज्या सदस्यांनी प्रश्न विचारला होता, त्याला बोलायची संधीच मिळाली नाही. अन्य सदस्यांनीच त्या प्रश्नामध्ये भाषणबाजी लांबविल्याने प्रश्न विचारलेल्या त्या सदस्यांनी सगळयांचे ऐकून माझे समाधान झाले अशी टिप्पणी करत आसनस्थ होणे पसंत केले. दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात सिनेट सदस्यांनी, ‘विद्यापीठातर्फे तीनही जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा या उत्तम पद्धतीने व्हाव्यात, गुणवत्ता वाढावी’ अशा सूचना केल्या.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी बारा वाजून ४७ मिनिटाला प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. विषयपत्रिकेवर एकूण २९ प्रश्न होते. सिनेट सदस्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी, ‘ ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२५ मध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील किती परीक्षा केंद्रावर बैठे पथक नेमले. जिल्हानिहाय परीक्षा केंद्राची संख्या किती अशी विचारणा केली. प्रशासनाने सिनेट सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांच्याकडे सोपविली होती. मात्र ते विद्यापीठाच्या कामकाजानिमित्त बाहेर गावी असल्याने सभेला अनुपस्थित होते. प्रशासनाने, सिनेट सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी ऐनवेळी सदस्य डॉ. बबन सातपुते यांच्यावर सोपविली. त्यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी जबाबदारी सोपविल्याने संबंधित प्रश्नाच्या अनुषंगाने नेमकी माहिती देण्यात मर्यादा पडल्या. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. सदस्यांचे उपप्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये तेरा मिनिटे संपली.
दुसरा प्रश्न हा परीक्षेतील गैरप्रकारामुळे गेल्या तीन वर्षात किती परीक्षा केंद्राची मान्यता काढून घेतली , आणि पुनर्मान्यता देण्याचे निकष काय असा प्रश्न होता. याप्रश्नाला प्रशासनाने जे लेखी उत्तर दिले होते, त्यामध्ये आकडेवारी चुकली होती. एकूण आठ केंद्राची मान्यता काढून घेण्यात आली होती. मात्र विषयपत्रिकेवर पाच केंद्राचा उल्लेख होता. उत्तर देताना सातपुते यांनी आकडेवारी दुरुस्त करुन सांगितली. पुनर्मान्यता काढण्याचे निकष कोणते ? या उपप्रश्नावर चर्चा भरकटत गेली. परीक्षेतील गैरप्रकार, कॉपीचे प्रकार, संबंधितांवर होणारी कारवाई, परीक्षेतील पारदर्शीपणा, गुणवत्ता वाढ याअनुषंगाने चर्चा झाली. प्रा. मनोज गुजर, प्रा. डी. एन. पाटील, श्रीनिवास गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर काळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य व्ही. एम. पाटील यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रा. डॉ. बी. एस. सावंत यांनी परीक्षकांची नियुक्ती विद्यापीठाने करावी अशी सूचना केली.
‘विद्यापीठ प्रशासनातील कार्यालयीन पत्रांच्या प्रती मागणी केल्यास दुबार स्वरुपात उपलब्ध करुन देण्याची पद्ध्त आहे का? ’असा प्रश्न डॉ. श्रीमती शाहीन अब्दुल अजीज पटेल यांनी विचारला होता. या विषयावर त्या बोलायला उभ्या राहिल्या. मात्र इतर सदस्यांनी या प्रश्नावरुन बोलायला सुरुवात केली. व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. मंजिरी मोरे यांनी प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. एव्हाना प्रश्नोत्तराच्या एका तासाची मुदत संपत आली होती. कुलसचिव शिंदे यांनी सभागृहाला प्रश्नोत्तराचा वेळ संपल्याचे सांगितले. यादरम्यानच कुलगुरू गोसावी यांनी डॉ. पटेल यांना तुमच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले का अशी विचारणा केली. त्यावर पटेल यांनी, ‘मी प्रश्न मी विचारुनही मला बोलायची संधी मिळाली नाही. इतर सदस्यांचे याविषयीचे भाषण ऐकून माझे समाधान झाले.’असे म्हणत आसनस्थ झाल्या. प्रश्नोत्तराचा त्रास सुरू असताना एक सदस्य खुर्चीवरुन खाली पडला. सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी सभागृहातील खराब खुर्चीकडे लक्ष वेधले, सभागृहाचे अलीकडेच नूतनीकरण झाले आहे मग खुर्ची इतक्या खराब कशा असा सवाल केला. त्यावर कुलगुरू गोसावी यांनी यामध्ये दुरुस्ती होईल असे सांगितले.