शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी !अक्षय जहागिरदारला राष्ट्रपती सुवर्णपदक, आर्या देसाईला कुलपती सुवर्णपदक ! !
schedule19 Dec 25 person by visibility 82 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ बुधवारी ( २४ डिसेंबर २०२५) सकाळी ११ वाजता होत आहे. भारताचे संरक्षण व अवकाश संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असतील; तर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित असतील. यंदाच्या दीक्षान्त समारंभात एकूण ४९,९०२ स्नातक पदवी घेणार आहेत. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या २८,५१३ इतकी लक्षणीय आहे. १६,१५९ स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी घेणार आहेत, तर ३३७४३ स्नातक पोस्टाने पदवी घेणार आहेत. दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर स्नातकांना त्यांची प्रमाणपत्रे त्यांच्या नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरी अकाऊंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र तसेच एनसीसी, एनएसएस यांमधील गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्वगुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल राज्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी अक्षय अरुण नलवडे-जहागीरदार यांना विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच, मार्च २०२५ मध्ये सर्व एम.ए. परीक्षांमधून ‘मानसशास्त्र’ विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल आर्या संजय देसाई (हुपरी) यांना कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे.
दीक्षांत समारंभानिमित्त २३ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत ग्रंथ महोत्सव होत आहे. २३ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजता कमला महाविद्यालय येथून कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. तेथून जनता बझार, राजारामपुरी मेन रोड, आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ गेट क्र. ६ या मार्गे दिंडीचे राजमाता जिजाऊ साहेब सभागृहातील दीक्षान्त सभा मंडपात आगमन होऊन तेथे विसर्जन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठाच्या अॅनेक्स इमारत प्रांगणात ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ग्रंथमहोत्सवातील स्टॉल दोन्ही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील.