एसटीच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पटकावले विजेतेपद, जळगावच्या संघाला उपविजेतेपद
schedule19 Dec 25 person by visibility 59 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील जैन व्हॅली परिसरातील अनुभूती मैदानावर पार पडल्या. स्पर्धात अंतिम फेरीचा सामना कोल्हापूर संघाने जिंकला. अंतिम सामन्यात जळगाव संघावर तीन गडी राखून विजय मिळवला.
नाणेफेक जिंकल्यानंतर जळगाव संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जळगांव संघाने ४० षटक खेळून ९ गडी बाद २०७ धावा केल्या. जळगांव विभागाची सुरुवात थंड पद्धतीने झाली. सुरुवातीलाच त्यांचे तीन बळी गेल्यामुळे वातावरण धीर गंभीर झाले होते. परंतु फलंदाजीसाठी आलेल्या अनिकेत न्हाळदे २९ धावा व मुद्दसर आझाद ४९ धावा तर जय छावरिया ४८ धावा यांनी चांगली फलंदाजी करून धावसंख्या वाढवली.कोल्हापूर तर्फे गोलंदाजीत रणधीर कांबळे १७ धावात चार बळी तर संदेश मराठेने ३५ धावात दोन बळी घेतले. कोल्हापूर विभागाने दमदार खेळ केला. प्रमोद समुद्रेने ५१ धावा तर प्रविण बागणेने ३० धावा केल्या. कोल्हापूर संघाचे कर्णधार संदेश मराठे नाबाद ४८ धावा व विनायक मुरकुटे नाबाद ५३धावा करत तब्बल १०१ धावाची भागीदारी करत कोल्हापूर संघाला 3 गडी राखून विजयी केले. सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तसेच स्पर्धेतिल उत्कृष्ट गोलंदाज़ पुरस्कार रणधीर कांबळे तर मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार व स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज संदेश मराठे, यांना मिळाला.
दरम्यान स्पर्धेतील उपांत्य सामना कोल्हापूर विरुद्ध सोलापूर यांच्यामध्ये होऊन कोल्हापूर विभागाने सोलापूर विभागावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यामध्ये कोल्हापूर विभागाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ४० षटकांमध्ये २८० धावा केल्या. प्रामुख्याने कर्णधार संदेश मराठे याने ७१ धावा तर सचिन मलके याने ६१ धावा ओमकार पाटील याने नाबाद ४३ धावा, शरद पाटील २० धावा केल्या. सोलापूर तर्फे गोलंदाजीत अब्दुल्ला शेख यांनी चार तर रोहन तारापूरकर याने दोन बळी घेतले. उत्तरार्धात सोलापूर विभागाचा संघ ३२.२ षटकात सर्व गडी बाद २०२ धावा केल्या. त्यांच्या अण्णा रणदिवेने ७६ धावा तर हर्षद आटलेने ३५ धावा केल्या. कोल्हापूर विभागातर्फे गोलंदाजी मध्ये विनायक मुरकुटेने चार तर रणधीर कांबळेने तीन बळी घेतले. या सामन्यातील सामनावीर कर्णधार संदेश मराठे याला घोषित करण्यात आले. विजेत्या कोल्हापूर संघाला, कोल्हापूरचे विभाग नियंत्रक अभय देशमुख, कामगार अधिकारी संदीप भोसले, दिपक घारगे, जितेंद्र इंगवले, राम करपे,बाळासाहेब माने यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.स र्व श्रमिक संघटना व कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे जल्लोषी स्वागत केले. बक्षीस वितरण समारंभास जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक. दिलीप बंजारा, कामगार अधिकारी कमलेश भावसार, सुरक्षा व दक्षता अधिकारी दिपक जाधव, लेखा अधिकारी मिलिंद सांगळे यांची विशेष उपस्थिती होती.