सीताराम येचुरी यांची वैचारिक लढाई प्रबोधनाच्या माध्यमातून सुरु ठेवू या - आमदार सतेज पाटील
schedule15 Sep 24 person by visibility 245 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव, माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे, देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. सीताराम येचुरी यांची वैचारिक लढाई प्रबोधनाच्या माध्यमातुन अविरतपणे सुरु ठेवूया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली वाहिली. ते शोकसभेत बोलत होते.
इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव, माजी खासदार कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी कोल्हापूरच्या वतीन शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, सीताराम येचुरी यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, सीताराम येचुरी म्हणजे संघर्षातून निर्माण झालेलं एक नेतृत्व होत. दिल्लीमध्ये त्यांना भेटण्याचा योगायोग आला, त्यावेळी वैचारीक दृष्ट्या ते किती सक्षम होते याचा अनुभव आला. विचाराचे ते पक्के होते. अशा अनेक आठवणी आमदार सतेज पाटील यांनी सांगितल्या. भविष्यकाळाचा भूगोल घडवताना जुना इतिहास महत्त्वाचा असतो. मात्र आता नवा इतिहास मांडायचा प्रयत्न सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे सिताराम येचुरी यांची वैचारिक लढाई प्रबोधनाच्या माध्यमातुन अविरतपणे सुरु ठेवूया. असे आवाहनही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केले. आमदार जयंत आसगावकर यांनी संविधानाला पोषक असे विचार येचुरी यांनी आयुष्यभर देशाला दिले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवल्याचं सांगितले. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी, इंडिया आघाडी तयार करण्यात येचुरी यांचे मोठ योगदान राहिले आहे.. त्यांच्या जाण्याने इंडिया आघाडीची फार मोठी पोकळी निर्माण झाल्याच त्यांनी सांगितले. कॉम्रेड प्राध्यापक एस के पाटील यांनी, धर्मनिरपेक्ष राजकीय लोकांना सिताराम येचुरी यांनी एकत्र आणले. भाजप आणि आर एस एस ला एक राजकीय पर्याय त्यांनी उपलब्ध केला. त्यांचे विचार त्यांची जबाबदारी आपण पुढे घेऊन जाऊया. धर्मनिरपेक्षता देशाची कशी टिकेल, त्यासाठी आपण प्रयत्न करूया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही कॉम्रेड प्राध्यापक एस के पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर, कॉम्रेड सुभाष गुरव, शेकापचे शहर चिटणीस बाबुराव कदम, राष्ट्र सेवा दलाचे भरत लाटकर, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड माया पंडित, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे आदीनी मनोगत व्यक्त करत, कॉम्रेड सिताराम येचुरी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कॉम्रेड अतुल दिघे, कॉम्रेड सुभाष जाधव, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी उपस्थित होते.