कोल्हापूर फर्स्ट पोहोचले दिल्लीत ! केंद्रीय मंत्र्यांच्यासोबत रेल्वे- रस्ते- पर्यटनासंबंधी चर्चा !!
schedule14 Mar 26 person by visibility 32 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर फर्स्ट या संस्थेच्या शिष्टमंडळाने ११ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विविध केंद्रीयमंत्र्यांच्या सोबत कोल्हापूरच्या विकासाच्या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
या शिष्टमंडळात कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन, मोहन कुशिरे, जयदीप पाटील, सतीश डकरे, मिलिंद आळवेकर, हरिश्चंद्र धोत्रे, पद्मसिंह पाटील, प्रताप कोंडेकर आदी सदस्यांचा समावेश होता.
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तावडे हॉटेल ते शिवाजी उड्डाणपूल प्रकल्प गतीमान करणे तसेच कोल्हापूर परिसरातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना वेग देण्याबाबत चर्चा केली. कोल्हापूर - सातारा - रत्नागिरी आणि मिरज या प्रमुख मार्गांवरील राष्ट्रीय महामार्गांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि जलद गतीने पूर्ण करण्याबाबत मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे प्रकल्पास तातडीने गती देण्याबाबत चर्चा झाली. या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या भागांना जलद, थेट आणि पर्यावरणपूरक संपर्क मिळणार असून पर्यटन, व्यापार, बंदर विकास, उद्योग तसेच एकूण सामाजिक-आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळेल, असे शिष्टमंडळाने नमूद केले. या प्रकल्पाचे सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन “कोल्हापूर - सातारा - कोकण पर्यटन सर्किट” विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर मंत्र्यांनी एक एप्रिलपासून जाहीर होणाऱ्या नवीन पर्यटन धोरणामध्ये कोल्हापूर परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. युवा कार्य व क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे कोल्हापूर येथील ईएसआयसी रुग्णालयाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविणे तसेच ईएसआयसीमार्फत कोल्हापूर येथे वैद्यकीय महाविद्यालय करण्यासंदर्भातील निवेदन दिले. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याची समृद्ध क्रीडा परंपरा आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर येथील खेळाडूंनी मिळविलेली पदके याबाबत माहिती देत जिल्ह्यात आधुनिक व केंद्रीकृत क्रीडा सुविधा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केले.
दिल्ली दौऱ्यादरम्यान खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी सांगितले , दिल्ली येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटींनंतर मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर तसेच अन्य विकासात्मक मुद्द्यांवर कोल्हापूर फर्स्टच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, सतिश डकरे, मिलींद आळवेकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, जयदीप चौगले, मोहन कुशिरे, राहूल पाटील, नेमचंद संघवी, सतीश घाटगे, सचिव अमर सासणे, बळीराम वराडे आदी उपस्थित होते.