वरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणी
schedule13 Mar 26 person by visibility 263 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना, टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सूट द्यावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत केली. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखत, सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणार्या शिक्षकांसाठी, टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात टीईटी सक्तीला शिक्षक वर्गाचा विरोध आहे. अशा परिस्थितीत आज खासदार महाडिक यांनी टीईटी परीक्षेची सरसकट सक्ती करणे योग्य नाही, असा मुद्दा संसदेत उपस्थित केला. गेल्या २० ते २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करणार्या शिक्षकांवर, पुन्हा टीईटी परीक्षा देण्याची सक्ती होत असल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यातून शिक्षकांवरील मानसिक ताण वाढत असून, सेवासुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. ज्येष्ठ शिक्षकांच्या सेवा आणि कार्यमूल्यांकनालाच पात्रतेचे निकष मानले जावेत आणि त्यांना टीईटी परीक्षेची सक्ती करू नये, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास, देशातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असेही खासदार महाडिक म्हणाले.