महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाही
schedule13 Mar 26 person by visibility 72 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या २०२६-२७ चे अंदाजपत्रक लवकरच सादर होत असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करु नये असे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना दिले. शिवसेनेचे गटतेने नगरसेवक शारंगधर देशमुख व ॠतुराज क्षीरसागर यांनी बैठक घडवून आणली. यावेळी गटनेते देशमुख व नगरसेवक क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकांत कोणतीही व्यावसायिक वाढ होऊ देणार नाही अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
यावेळी बोलताना चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांच्या भाडे प्रश्नांसंबंधी२०१५ पासून वाद सुरु आहे. महापालिकेच्या भाडे व ठेव निर्धारण समितीने २०१९ पुढील भाडे निश्चित केले होते. भाडे एकरकमी भरल्यास त्यावर जे दंड व व्याज येईल त्यावर अभय योजना लागू करुन देण्यात आली होती. त्या अनुषंगाने उपस्थित प्रश्नावर बोलताना नगरसेवक देशमुख यांनी गाळेधारकांसाठी पुन्हा अभय योजना आणणेसाठी आपण प्रयत्नशील आहे असे सांगितले. यावेळी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कायद्याने दोनवेळा अभय योजना देता येते का याची माहिती घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. ज्या गाळेधारकांनी २०१९ पुढील भाडे अजूनही भरलेले नाही त्यांची यादी कोल्हापूर चेंबरकडे द्यावी व ज्यांनी भाडे भरले आहे त्यांना एनओसी द्यावी असेही अजित कोठारी यांनी सांगितले.
अमर क्षीरसागर यांनी जीएसटी जुलै २०१७ मध्ये लागू झाला असताना सन २०१५ ते २०१७ मधील थकीत गाळेधारकांना जीएसटी च्या नोटीसा महापालिकेने काढल्या आहेत. नोटीसा दुरुस्त करुन देण्याची मागणी त्यांनी केली. खुल्या व विस्थापित गाळेधारकांच्या प्रश्नांकडे किशोर वाटवे यांनी लक्ष वेधले. तर सील केलेले गाळे चालू करुन देण्याची मागणी ॠतुराज क्षीरसागर व देशमुख यांनी आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना केली. आमदार अमल महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार असून तोवर कारवाई थांबविण्यात यावी असे ॠतुराज क्षीरसागर यांनी सांगितले. अजित कोठारी यांनी २०२३-२४ मध्ये महापालिकेने परवानाधारकांना सवलत योजना लागू केल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षी देखील अभय योजना लागू करावी असे सांगितले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स संचालक संपत पाटील राहुल नष्टे, अविनाश नाशिपुडे, संदीप वीर, आदी उपस्थित होते