कारकिर्द कोल्हापुरातच घडली ! मी स्वत:ला कोल्हापूरकरच मानतो !!
schedule26 May 23 person by visibility 695 categoryलाइफस्टाइल

पुस्तक प्रकाशन समारंभात माणिकराव साळुंखेचे भावोत्कट उद्गगार
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूरची बातची काही और आहे. चांगल्या कार्याला आशीर्वाद द्यावेत ते कोल्हापूरकरांनीच. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोल्हापूरच्या लोकांचे आशीर्वाद लाभले. या शहराने नेहमीच मला धैर्य दिले. मी सांगली जिल्ह्यातील धनगावचा असलो तरी मी स्वत:ला कोल्हापूरकरच समजतो. सगळी कारकिर्द येथेच घडली.’असे भावोत्कट उदगार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पाच विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी काढले.
निमित्त होते, ‘विद्येच्या प्रांगणात’या आत्मकथनाचे प्रकाशनाचे. डॉ. माणिकराव साळुंखे यांची जीवनकहाणी उलगडून दाखविणाऱ्या ‘विद्येच्या प्रांगणात’या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात झाला. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झाले. आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, मराठी विभागाचे डॉ. रणधीर ,शिंदे व्यासपीठावर होते.
तुडुंब भरलेल्या सभागृहात दोन तासहून अधिक वेळ रंगलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळयात बोलताना माणिकराव साळुंखे यांचा कंठ दाठून आला. ‘माझ्या जीवनातील हा आनंदाचा प्रसंग आहे’असे प्रारंभीच नमूद करत साळुंखे यांनी जीवनपट उलगडला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे यांनी माझ्या प्रयोगशाळेला भेट दिली होती अशी आठवण सांगत विज्ञान आणि तंत्रज्ञानांशी नातं सांगणारे व्यक्तिमत्व पुस्तक प्रकाशन सोहळयाला उपस्थित राहिल्याने वेगळे समाधान असल्याचे साळुंखे यांनी कृतज्ञातपूर्वक नमूद केले..
‘मला राजकारणाची आवड होती. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या विद्यार्थी मंडळाचा मी चेअरमन होतो. गावाकडे नात्यातील अनेक मंडळी राजकारणात होती. पण राजकारणासाठी आवश्यक बळ माझ्याकडे नव्हते. म्हणून मी त्या प्रांतापासून दूर झालो. शिक्षण क्षेत्रातच माझी कारकिर्द घडावी यासाठी प्रा. एम. बी. चव्हाण, मानसिंगराव जगदाळे यांची शिकवण उपयुक्त ठरली’असे सांगत साळुंखे यांनी जुन्या आठवणी उलगडल्या. मी शेतकरी कुटुंबांतील, ग्रामीण भागातील पण अभ्यासात विशेष प्रगती (अॅडव्हान्स लर्नर) असल्यामुळे मला दुसरीच्या वर्गातून थेट चौथीच्या वर्गात बसविले. गावात सातवीपर्यंत शाळा होती. पुढे भिलवडी येथे शिकायला गेलो. प्रत्येक ठिकाणी काही ना काही शिकायला मिळाले. अनुभव समृद्ध करणारे होते. चांगले शिक्षक भेटले. दरम्यान १९६८ मध्ये भूकंप झाला. आईवडिलांना मी एकटा मुलगा, माझ्या काळजीपोटी त्यांनी मला कोल्हापूरला शिकायला पाठविले.’गत काळातील आठवणी उलगडताना काही वेळेला साळुंखे यांना गहिवरुन आले.
‘विकास हायस्कूल येथे शिकलो. येथे चांगले वातावरण होते. पुढे जुना बुधवार पेठेतील विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथे एक प्रकारची शिस्त होती. विवेकानंद कॉलेजने जीवनाला दिशा दिली. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांचा सहवास लाभला. गांधीवादी विचाराचे त्यांचे व्यक्तिमत्व. राजाराम कॉलेज, विलिंग्डन कॉलेज येथेही शिकलो. वास्तविक मेडिकलचा माझा प्रवेश किरकोळ गुणांनी हुकला. पुढे पोस्ट ग्रॅज्युएटसाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. विद्यार्थी मंडळाचा चेअरमन झालो. माझ्या आयुष्यात आई-वडील, पत्नी, नातेवाईकांची मोठी साथ मिळाली. ’असे सांगत साळुंखे यांनी वाटचाल उलगडली. पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार, कुलसचिव उषा इथापे यांच्याविषयी त्यांनी ऋणभाव व्यक्त केला.
‘प्राध्यापक, प्रोफेसर, संशोधक, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संचालक असे जीवनातील विविध टप्पे उलगडताना माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘ या कालावधीत माझा दृष्टिकोन बदलला. वयाच्या ४९ व्या वर्षी मी शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू बनलो. माझ्या जीवनावर महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग् या पुस्तकाचा मोठा प्रभाव आहे. सत्याचे प्रयोग हा जीवनातील सत्य सांगण्याचा धाडसी प्रयत्न. तेवढे सत्य सांगण्याचे धाडस माझ्याकडे आहे की नाही याविषयी मला शंका असल्यामुळे आत्मकथा लिहिण्यास माझा नकार होता. मात्र इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा संचालक, पाच विद्यापीठाचे कुलगुरुपद हे सारे सारे अनुभव शब्दबद्ध करावेत असा अनेकांचा आग्रह होता. केंद्रीय विद्यापीठाची तर शून्यातून सुरुवात होती. भारती विद्यापीठातील पाच वर्षे सन्मानाची होती. संशोधक, प्रशासक अशी ही जीवनकहाणी. आत्मकथा लिहिण्याअगोदर मी, अनेकांची आत्मचरित्रे वाचली. आत्मकथन लिहिताना अनेकांनी वेगवेगळया पद्धतीने मदत केली. कोल्हापुरातच माझी सगळी कारकिर्द घडली. चांगल्या कार्याला आशीर्वाद द्यावेत ते कोल्हापूरकरांनीच. या शहराने मला नेहमीच धैर्य दिले. म्हणून मी स्वतला कोल्हापूरकर मानतो !’