कागलचे राजकारण कोणत्या दिशेने ? श्रेयवादातून एकाच आरोग्य केंद्राचे दोनदा भूमिपूजन !!
schedule11 Sep 24 person by visibility 369 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यातील कुरघोडीचे राजकारण भलतेच रंगले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघेही एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. श्रेयवादातून बाचणी येथील एकाच आरोग्य केंद्राचे दोनदा भूमिपूजनचा कार्यक्रम झाला. यावेळी दोघांनीही एकमेकांवर तोंडसुख घेतले.
समरजितसिंह घाटगे हे भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी या आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे हा विषय मार्गी लागला असा दावा घाटगे समर्थकांचा आहे. घाटगे यांच्या हस्ते मंगळवारी, दहा सप्टेंबर रोजी आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घोषित झाला. घाटगे यांनी या केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्याअगोदरच पालकमंत्री मुश्रीफ यांची यंत्रणा कामाला लागली. प्रोटोकॉलचा आधार घेत मुश्रीफ यांनी सोमवारी, ९ सप्टेंबर रोजी आरोग्य केंद्राचे भूमिपूजन केले. याप्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त होता. याप्रसंगी मुश्रीफ गटाचे समर्थक सुर्यकांत पाटील, बाळासाहेब तुरंब, दिनकर कोतेकर, मनोज फराकटे, बळवंत पाटील, डी. एम. चौगले, दत्ता पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधला. मुश्रीफ म्हणाले, ‘२०१३ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बृहत आराखडयाला मंजुरी मिळाली. त्यावेळी काहीचा राजकीय जन्मही झाला नव्हता. ज्यांना कोणतेही संविधानिक पद नाही. निधी नाही. मंजुरीशी कसलाही संबंध नाही.असे लोक भूमिपूजनाचा स्टंट करत आहेत. हा शुद्ध वेडेपणा आहे. ’
दुसरीकडे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते नियोजनाप्रमाणे मंगळवारी आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. सरपंच जयश्री पाटील अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, प्रताप पाटील, डी. एस. पाटील, रंगराव जाधव, संजय पाटील, आनंदी पाटील, अन्सार नायकवडी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर बोचरी टीका केली. घाटगे म्हणाले ‘‘चाळीस वर्षे राजकारणात, गेली कित्येक वर्षे मंत्री, पण पोलिस बंदोबस्तात प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करावा लागतो. हे मंत्र्यांना अशोभनीय आहे. स्वत:ला कार्यतत्पर समजता, मग आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनाला अकरा वर्षे का लागली ? बाचणी परिसराला आरोग्य सेवेपासून वंचित का ठेवले ?”