शाहू मिलमध्ये जत्रा आंब्यांची ! प्रदर्शनात आंब्यांच्या विविध ५२ जाती !!
schedule06 May 23 person by visibility 274 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली असून उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच आंबा उत्पादकांनी क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शाहू मिल येथे आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले उपस्थित होते.
आंबा प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या विविध ५२ जाती पाहण्यासाठी व माहिती होण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या मध्ये जहांगीर पसंत, गोवा मानकूर, हापूस, सुपर केशर, करण जिओ, मबाराम, तोतापुरी, वनराज, बनारसी हापूस, दूध पेढा, वेलाई कोलंबन, रुमानी, सब्जा, केशर, करेल, मुशराद, बाटली, बबेंगलोर गोवा, मलीका, बदाई गोवा, बदामी, उस्टीन, लिली, सिंधू, आम्रपाली, माया, केंट, निलम, रायवळ, लंगडा, पायरी, टॉम ऑटकीन, बारमाही, जम्बो केशर, बारमासी, बनेशान, इस्रायली, पामर, किट, फर्नांडिस, बिटक्या, दशहरी, कोकण सम्राट, रत्ना, सोनपरी, सिंधू, फ्रान्सिस आदी दुर्मिळ आंब्यांच्या जाती आहेत. केशर व हापूस आंबा रोपे याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.