जयवंत महाविद्यालयाच्या पेटंट डिझाईनवर भारत सरकारची मंजुरीची मोहोर
schedule30 Oct 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक
डॉ. कपिल राजहंस, डॉ वसंत भागवत यांनी विकसित केलेल्या पेटंट डिझाईनला भारत सरकारची अधिकृत मान्यता_
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयमधील आयपीआर (बौद्धिक संपदा हक्क) सेलचे संचालक प्रा. डॉ. कपिल राजहंस आणि ग्रंथपाल डॉ. वसंत भागवत यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण 'इंटरअॅक्टिव्ह हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन डिस्प्ले डिव्हाइस') या उपकरणाच्या पेटंट डिझाईनला भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या पेटंट व डिझाईन कार्यालयाकडून अधिकृत मंजुरी प्राप्त झाली आहे.
डॉ. राजहंस यांचे हे ५४ वे पेटंट डिझाईन आहे. इतिहास हा विषय केवळ पुस्तकी पाठांतरापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी अधिक दृश्यमान, संवादी आणि सुलभ व्हावा या उद्देशातून या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या विशेष उपकरणाच्या साहाय्याने गडकिल्ल्यांची माहिती, ऐतिहासिक नकाशे, दुर्मीळ मोडी दस्तऐवज आणि महत्त्वाचा घटनाक्रम थेट स्क्रीनवर परस्परसंवादी पद्धतीने अभ्यासता येतो. विद्यार्थी अथवा इतिहास संशोधक स्क्रीनवरील माहिती आपल्या गरजेनुसार हाताळून सखोल संदर्भ सहज मिळवू शकतात. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये आणि ऐतिहासिक संग्रहालयांमध्ये इतिहास विषयाचे अध्ययन व अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, माजी समाजकल्याण मंत्री जयवंतराव आवळे, संस्थेचे अध्यक्ष संजय आवळे, प्रशासन अधिकारी संजय भोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर युसूफ जमादार यांचे मार्गदर्शन लाभले.