लोकमंगलच्या माध्यमातून करवीरवासियांना बँकिंगच्या अधिकाधिक सुविधांची उपलब्धता
schedule30 Oct 26 person by visibility 15 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँकेच्या कोल्हापूर शाखेच्या माध्यमातून करवीरवासियांना बँकिंगच्या अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहे. या सुविधांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे संचालक प्रा. नरेंद्र काठीकर यांनी केले. कोल्हापुरातील अॅलिक्सा पार्क येथे लोकमंगल बँकेच्या आठव्या शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी, (२९ ऑक्टोबर २०२६) दिमाखात पार पडला.
लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोल्हापुरातील शाखेचा उद्घाटन सोहळा झाला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २८ एप्रिल १९९८ रोजी लोकमंगल बँकेची स्थापना झाली. बँकेच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी अर्थ पुरवठा केला जातो. अत्यल्प व्याजदरात सोने तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या विविध महामंडळ अंतर्गत बँकेने आतापर्यंत ३१२२ ग्राहकांना ३६४ कोटी ४७ लाखांहून अधिक कर्ज वाटप केले आहे. यामध्ये आई पर्यटन कर्ज योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग कर्ज योजना, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, अमृत योजना, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ या योजनांचा समावेश आहे.
‘बँकेचा पंधरा जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र विस्तार आहे. तसेच बँकेच्या आठ शाखा आहेत. गोल्डफिंच पेठ सोलापूर, मंगळवेठा, हडपसर पुणे, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, सांगोला, आणि कोल्हापूर येथे शाखा आहेत. आज बँकेची सभासद संख्या चौदा हजारांहून अधिक आहे. बँकेच्या ठेवी ९०१ कोटी आहेत. ५२३ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. निव्वळ नफा पाच कोटी ९० लाख रुपये इतका झाला आहे. ग्राहकाभिमुख योजनेमुळे बँकेने विश्वास संपादन केला आहे.’असे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बायस यांनी सांगितले.