निवडून दिलेल्या संचालकांना जर सत्तेत बसू देत नसाल तर लोकांचा प्रक्षोभ होईल- सतेज पाटलांनी सुनावले महायुतीला खडेबोल
schedule29 Oct 26 person by visibility 331 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ’ नविद मुश्रीफांच्या चेअरमनपदाच्या निवडीसाठी त्यांच्या नावाचे पाकीट मीच तत्कालिन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे दिले होते. त्यावेळी मी जातीयवादी नव्हतो का अशा शब्दांत काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी जातीय राजकारण केले असा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला होता. मंत्री मुश्रीफ यांच्या टीकेचा समाचार आमदार पाटील यांनी घेतला. तसेच गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरुन गुरुवारी, २९ ऑक्टोबर २०२८ दिवसभर घडलेल्या घडामोडी, महायुतीच्या संचालकांची अध्यक्ष निवडीच्या बैठकीला गैरहजेरी यावरही आमदार पाटील यांनी,‘ दूध उत्पादकांनी निवडून दिलेल्या संचालकांना जर सत्तेत बसू देत नसाल तर लोकांचा प्रक्षोभ होईल. ’अशा शब्दांत इशारा दिला.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी संचालक मंडळाची सभा गुरुवारी आयोजित केली होती. या सभेकडे महायुतीच्या संचालकांनी पाठ फिरवली.२५ संचालक मंडळ असलेल्या गोकुळच्या अध्यक्षपद निवडीसाठी सभेला १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे.यासंबंधी गोकुळचा पोटनियम असल्याचे दर्शवित महायुतीच्या गोकुळमधील संचालकांनी बैठकीला गैरहजर राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेसाठी आवश्यक संचालकांची गणपूर्ती होत नसल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या त्या निर्णयाला समविचारी आघाडीच्या तेरा संचालकांनी आक्षेप घेत बहुमत आपल्याकडे आहे अध्यक्ष निवडावा असा आग्रह धरला. मात्र अधिकाऱ्यांनी तो मान्य केला नाही. यानंतर तेरा संचालकांनी एकत्र येत संचालक बाबासाहेब चौगले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली व गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड केल्याचे घोषित केले.
गोकुळ अध्यक्ष निवडीवरुन दिवसभरातील घडामोडी, मंत्री मुश्रीफांचा आमदार पाटील यांच्यावर जातीयवादी राजकारणा केलेला आरोप या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या नेतेमंडळीचा समाचार घेतला. आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दूध उत्पादकांनी दिलेल्या कौलनुसार समविचारी आघाडीचा अध्यक्ष व्हायला पाहिजे. शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले होते. अध्यक्ष निवडीसाठी महायुतीच्या संचालकांनी सभेला उपस्थित राहावे यासाठी मंत्री मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरुन बोललो. मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक यांना फोन केले. मात्र त्यांनी उचलला नाही. महायुतीच्या काही संचालकांनी सभेला येण्याची ईच्छा होती, पण त्यांनी नेतेमंडळीशी तुम्ही बोला असे कळविल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये महायुतीच्या संचालकांना ६५ टक्के मतदार झाले असून बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा केला. त्या विधानाचाही आमदार पाटील यांनी समाचार घेतला. ‘अध्यक्षपदाची निवड ही मतदानाच्या टक्केवारीवर नव्हे तर संचालक मंडळाच्या बहुमतावर होते.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपद सदस्य संख्येच्या बळावर झाला की मतदानाच्या टक्केवारी हे मुश्रीफांनी सांगावे.नविद मुश्रीफ यांना महायुतीकडूनच मतदान झाले नाही. ४४०० ठरावधारक महायुतीकाडे आहेत असा दावा करत होता, मग मतदान का झाले नाही यासंबंधी आत्मचिंतन करावे.असा टोलाही आमदार पाटील यांनी लगाविला.गोकुळमध्ये माझा मुलगा चेअरमन होणार नाही. दूध उत्पादकांसाठी आमची लढाई आहे. महायुतीच्या संचालकांना दूध उत्पादकांनी निवडून दिले आहे. त्या बारा संचालकांनी बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते असे पाटील म्हणाले.
समविचारी आघाडीकडे बहुमत असून अध्यक्ष म्हणून शशिकांत पाटील यांची निवड केली आहे. तेव्हा प्रशासक मंडळाने कारभार आमच्याकडे सोपवावा असे पत्र प्रशासक मंडळाला देण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘गोकुळ अध्यक्ष निवडीवरुन जे राजकारण महायुतीकडून सुरू आहे ते कोल्हापूरच्या लोकांना मान्य नाही. सहकारातील आजचा दिवस हा काळा आहे.’
पत्रकार परिषदेला माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, गोपाळराव पाटील, समविचारी आघाडीचे संचालक संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रा. किसन चौगले, राहुल देसाई, शशिकांत खोत, विश्वजीत जाधव, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, बाबासाहेब देवकर, विद्याधर गुरंबे, बयाजी शेळके आणि राजूबाबा आवळे उपस्थित होते.