थेट पाईपलाईनसाठी आमरण उपोषण करणारा मी पहिला आमदार : राजेश क्षीरसागर
schedule11 Nov 23 person by visibility 972 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " कोल्हापूर शहराला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूरला पाणीपुरवठा करावा यासाठी विधानभवनाच्या पायरीवर आमरण उपोषण करणारा मी पहिला आमदार आहे, हे साऱ्या जनतेला ठाऊक आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचा एक नेता या योजनेचे श्रेय घेऊ पाहत आहे, पण थेट पाईपलाईनसाठी कोणी कोणी संघर्ष केला, लढा दिला हे सारे कोल्हापूरवासियांना माहित आहे." अशा शब्दात राज नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भूमिका मांडली. थेट पाईपलाईन योजनेमध्ये काँग्रेसच्या एका नेत्यांनी 75 कोटी रुपयांचा ढवळा पाडला आहे या प्रकाराची ईडीमार्फत चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे पाणी शुक्रवारी रात्री पूर्ईखडी प्रकल्प येथे पोहोचले. कोल्हापूर शहरासाठी महत्त्वाची योजना मार्गी लागल्यामुळे शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी चौक येथे शनिवारी दुपारी बारा वाजता साखर व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला. शिंदे- फडणवीस-पवार सरकारच्या कालावधीत योजना पूर्ण झाली. यानिमित्त शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले.
." जय भवानी - जय शिवाजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो, राजेश क्षीरसागर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, '' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पारंपारिक वाद्याच्या ठेक्यावर फेर धरला.
दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी शुक्रवारी रात्री पुईखडी प्रकल्प येथे जाऊन पाणी पूजन केले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळून केली होती.
दरम्यान शिवसेनेच्या वतीने शनिवारी शिवाजी चौकात साखर व पेढे वाटप केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, " १९८० ते २०१० या तीस वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर शहराला शुद्ध पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. अशुद्ध पाणी पुरवठामुळे वेगवेगळे साथीचे आजार उद्भवले. काही जणांना जीवही गमवावा लागला.२००९ मध्ये कोल्हापुरातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित करावी यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर मी आमरण उपोषण केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अर्थमंत्री अजित पवार, नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मी उपोषण मागे घेतले होते. खरे तर मी आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर सरकारला जाग आली आणि पुढे ही योजना मंजूर झाली. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका नेत्याला वाटते की सगळे माझ्यामुळेच घडते. त्यामुळे ऊठसूठ ते प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत असतात. मी उपोषण केल्यावर मला श्रेय मिळू नये म्हणून काँग्रेसच्या त्या नेत्याने त्यावेळीही खटाटोप केला. शुक्रवारी रात्रीही काँग्रेसच्या नेत्याने पुईखडी प्रकल्प येथे जाऊन गुलाल उधळला. मात्र कोल्हापुरातील जनतेला थेट पाईपलाईन योजनेसाठी कोणी कोणी संघर्ष केला लढा दिला हे सगळे ठाऊक आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट पाईपलाईन योजनेमध्ये काँग्रेसच्याच एका जिल्ह्यातील नेत्यांनी ७५ कोटी रुपयांचा ढपला पाडलि होता असा आरोप केला होता. पाईप लाईन योजनेमध्ये ७५ कोटी रुपयांचा ढपला पाडणाऱ्या त्या काँग्रेसच्या नेत्याची ईडीमार्फत चौकशी करावी यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.
शिवाजी चौक येथे झालेल्या साखर पेढे वाटपावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, रंणजीत जाधव, किशोर घाटगे, अंकुश निपाणीकर, सुनील जाधव मंगल साळुंखे आदी सहभागी झाले.