गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला कोल्हापुरात बंदी : एसपी महेंद्र पंडित
schedule20 Sep 23 person by visibility 1204 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला कोल्हापुरात गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले होते, मात्र या दोन्ही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या महाराष्ट्रभर मोठी क्रेझ आहे. ठिकठिकाणी तिच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र अतिउत्साही प्रेक्षकाकडून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचेही उदाहरणे आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हामध्ये गणेश उत्सवाच्या कालावधीत गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. करवीर तालुक्यातील नंदगाव येथे तिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र करमणूक विभागाने त्याला परवानगी नाकारली. याशिवाय राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे गौतमीचा कार्यक्रम होणार होता. तरुण मंडळाच्या वतीने तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान उत्सवाच्या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे . गणेश उत्सव सुरळीतपणे पार पडावा, नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस मोठ्या संख्येने बंदोबस्ताला असतात. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला बंदोबस्त पुरविता येणार नाही. शिवाय यापूर्वी गौतमीचे ज्या ठिकाणी कार्यक्रम झाले तेथील काही अनुभव लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात तिच्या कार्यक्रमाला बंदी घातली आहे असे प्रशासनाने स्पष्ट केले. गौतमी पाटीलचा २२ सप्टेंबर रोजी नंदगाव येथे तर २४ सप्टेंबर रोजी राशिवडे येथे नृत्याचा कार्यक्रम होणार होता.