डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर
schedule23 Jan 25 person by visibility 174 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे गेली वीस वर्ष रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटेल असा विश्वास डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी पाटील यांनी व्यक्त केला.
डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जन्मतः फाटलेले ओठ किंवा टाळू, जन्मतः लघवीचा बदललेला मार्ग, चेहऱ्याचे व्यंग, भाजल्यामुळे आलेली विद्रुपता, स्नायूंचा आखडलेपणा, बसलेले नाक व विद्रुप बोटे यावर दिल्ली, लुधियाना, बडोदा, राजकोट, पुणे येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. एस पी बजाज म्हणाले, शारीरिक व्यंग, व्रण, फाटलेले ओठ अशा अनेक समस्या असलेले हजारो लोक प्लास्टिक सर्जरी उपचारांपासून आजही वंचित आहेत. अशा लोकांसाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना याचा फायदा होईल. रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी, असिस्टंट गव्हर्नर यतीराज भंडारी, रोटरी क्लब कोल्हापूरचे प्रेसिडेंट अरुण गोयंका, रोटरी क्लब इचलकरंजीचे इव्हेंट कॉर्डीनेटर रिशी मोहंका, ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉ. एस पी बजाज, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लब कोल्हापूरचे सेक्रेटरी साहिल गांधी, इव्हेंट चेअरमन डॉ. अभिजीत हावळ, रोटरी क्लब इचलकरंजीचे प्रेसिडेंट संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. रविद्र तहा, डॉ. राजेन्द्र गांधी, डॉ. हिरेन भट, डॉ. पियुष दोषी, डॉ. अरुण देशमुख, डॉ. शीतल मिरचूटे, डॉ. संदीप कदम, संजय जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते.