Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !सोमवारी अध्यक्ष बनले, गुरुवारी खत कारखाना सुरू झाला ! बाबासाहेब शिंदेंचे कृतिशील पाऊल !!महापालिकेकडून शहरातील उद्यानांचा खेळखंडोबा ! प्रवेशद्वारासमोर खेळणी रचून आपचे आंदोलन !!नवोदित उद्योजकांसाठी केआयटीची अभिनव संकल्पना, ई-समिटमध्ये ४०० विद्यार्थ्यांचा सहभागडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापनाकेआयटी कॉलेजमधील ग्रंथपाल रोहन पवार यांना पीएचडी जाहीरजुनी पेन्शन संघटना करवीर शाखेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा गौरव

जाहिरात

 

महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचाली

schedule13 Mar 25 person by visibility 642 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षात सध्या संघटनात्मक निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. महानगर अध्यक्षपदावर डोळा ठेवून अनेकजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत. साधारणपणे मार्च २०२५ अखेर या नवा अध्यक्ष निवडीची शक्यता आहे. महानगर अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, संदीप देसाई, आणि अशोक देसाई यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. संघटनात्मक पातळीवर निवडी होणार असल्या तरी यामध्ये अंतिम शब्द हा उच्च  व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा असणार आहे. जिल्हाध्यक्ष निवडीत त्यांची शिफारस महत्वाची ठरणार आहे.

भाजपामध्ये सध्या संघटन पर्व अंतर्गत प्राथमिक सदस्यता नोंदणी सुरू आहे.  बूथ कमिटी, सक्रिय सदस्य, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी निवडीनंतर महानगर जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार आहे. भाजपमध्ये तीन वर्षासाठी पदाधिकारी निवडी होतात.  सध्या विजय जाधव यांच्याकडे महानगर जिल्हाध्यक्षपद आहे. मार्च २०२३ मध्ये त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपविले होते. अध्यक्षपदाचा दोन वर्षाइतका कालावधी मिळाल्यामुळे आणखी एक टर्म मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी यापूर्वी जिल्हा सरचिटणीस, प्रवक्ता या पदावर काम केले आहे. ते ही अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. संदीप देसाई यांनी यापूर्वी एकदा अध्यक्षपद  भूषविले आहे. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी म्हणून काम केले आहे. अध्यक्षपदी काम करण्यासाठी ते ही इच्छुक आहेत. अशोक देसाई ही या पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनीही सरचिटणीसपदावर काम केले आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. यामुळे संघटनात्मक पातळीवर काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाही महत्व आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडीकडे लक्ष लागून आहे. इच्छुकांनी आतापासूनच फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. नेते मंडळीची भेट घेऊन पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, पश्विच महाराष्ट्र संपर्क प्रमुख मकरंद देशपांडे, आमदार अमल महाडिक यांच्याही काहींनी भेटी घेतल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा, त्यांना बळ देणारा नेता म्हणून चंद्रकांत पाटील यांची ओळख आहे.   दरम्यान संघटनात्मक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अनेकदा धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. यामुळे महानगर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत ऐनवेळी नवीन चेहरा समोर आला तर आश्चर्य वाटायला नको. पदापासून लांब राहिलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यास ते संघटनेसाठी उपयुक्त ठरू शकते असाही कार्यकर्त्यांचा मानस आहे.

………………….

भाजपातंर्गत धुसफूस जास्त, गटबाजीही वाढली

पक्ष म्हणून भाजपाचे संघटन, बूथ रचना भक्कम मानले जाते. दरम्यान पक्षातंर्गत कुरबुरी जास्त आहेत. कोल्हापूर शहरात भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. पक्ष म्हणून सगळेजण एक असले तरी काही जणांचे स्वतंत्र गट आहेत. कोणताही कार्यक्रम असो,  ठराविक मंडळी व्यासपीठावर असतात. भाजपा कार्यकर्त्यांना नेतेमंडळीपर्यंत पोहोचू देत नाहीत असा आक्षेप संघटनेतील कार्यकर्ते नोंदवित आहेत. काही जण संघटना माझी अशी समजून कारभारी बनली आहेत अशी ओरड कार्यकर्ते करत आहेत. अध्यक्ष मी नाही... तर माझ्या मर्जीतील अशी काहींची धारणा बनली आहे. त्यांच्या कारभाराला ब्रेक बसणार का ? असा सवालही कार्यकर्ते करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes