मुलांच्या दातांच्या आकारानुसार फ्लेक्झिबल टूथब्रश, डेंटिस्ट राहुल चौगुलेंच्या संशोधनाला पेटंट !
schedule19 Nov 23 person by visibility 557 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूरच्या आरोग्यक्षेत्रात अल्पावधीतच आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या आणि नवनवीन प्रयोगाद्वारे नेहमीच दात आणि मौखिक आरोग्य याविषयी कार्यरत असणाऱ्या कोल्हापुरातील लिटल स्माईल या किड्स डेंटल क्लिनिकचे बाल दंतरोग तज्ज्ञ डॉ. राहुल चौगुले यांना ‘सस्पेंशन मेकॅनिजम सरफेस क्लिनिंग टूथब्रश’ या वेगवेगळ्या दातांच्या आकारानुसार वापरात येणाऱ्या अभिनव अशा टूथब्रशच्या संकल्पनेसाठी भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून पेटंट मिळाले आहे.
आपल्या प्रत्येकाच्या जबड्याचा आणि दातांचा आकार वेगवेगळा असतो. त्यामुळे त्यांची योग्य स्वच्छता होण्यासाठी दात आणि हिरड्यांच्या आकाराशी जुळवून घेणारा टूथब्रश आवश्यक आहे. दोन दातांच्या फटीत व दात आणि हिरड्या यामधील जागेत जिथे अन्नाचे कण अडकतात, तेथील स्वच्छता व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे दोन दोन वेळेला ब्रश करूनही दात दुखणे, दात व दाढा किडणे, हिरड्यातून रक्त येणे अशा अनेक समस्यांना अनेक जणांना सामोरे जावे लागते.
डॉ.चौगुले गेल्या पंधरा वर्षापासून लहान मुलांचे डेंटिस्ट म्हणून मुलांच्या दात आणि त्यांच्या आरोग्य याविषयी उपचार आणि संशोधन करीत आहेत. त्यांनी डिझाईन केलेल्या या टूथब्रशचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये ब्रश हेडला अत्यंत फ्लेक्जीबल बनविण्यात आले आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या दातांच्या आणि हिरड्यांच्या आकाराशी जुळवून घेऊन अत्यंत योग्य प्रकारे त्यांची स्वच्छता करणे सहज शक्य होते.
साधारणत: ९ वर्षांपर्यंतच्या मुलांना नीट ब्रश करता येत नाही. त्यांच्या दातांची स्वच्छता पालकांनी करणे अपेक्षित असते.
काही मुलांमध्ये दात अत्यंत वेडेवाकडे असतात, मध्येचं दात नसतो किंवा दातांमध्ये मोठी फट असते. पण बऱ्याच वेळेला पालकांकडून बाजारात असणाऱ्या ब्रशने लहान मुलांच्या दातांना ब्रश करताना गरजेपेक्षा जास्त प्रेशर दिला जातो. त्यामुळे लहान मुलांचे दात आणि हिरड्या दुखतात. काही वेळेस यामुळे त्यांच्या दातांना इजा होण्याची ही श्यक्यता असते. यामुळे लहान मुले ब्रश करायला नकार देतात. आणि यातूनच लहान मुलांच्या दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात. चौगुले यांनी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून बनवलेल्या या ब्रशमुळे लहान मुलांच्या दातावर अतिरिक्त प्रेशर न येता त्यांचे दात स्वच्छ करणे सहजशक्य होणार आहे. त्यामुळे लहानांचे मौखिक आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. डॉ. चौगुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील हेरले येथील आहेत. त्यांनी नाशिक विद्यापीठातून पदवीपर्यंतचे वैद्यकीय शिक्षण घेतले. लखनऊ येथील किंग जॉर्ज इन्स्टिट्यूशन येथे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. इंडियन डेंटल असोसिएशन, कोल्हापूर ब्रँचचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.