राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेचा समारोप दिमाखात
schedule13 Oct 25 person by visibility 16 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कणेरी येथे दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा २०२५ चा समारोप समारंभ दिमाखात झाला. काडसिद्धेश्वर हायस्कूल,कणेरी येथे ही स्पर्धा पार पडली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, श्री काडसिद्धेश्वर स्वामी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रकुलगुरू मिलिंद निकुंभ यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमान या स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी विजेत्या खेळाडूंना व संघांना मेडल्स, प्रशस्तीपत्रे आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यात स्वागत करतो. खेळात हरलेल्यांनी हार न मानता पुन्हा प्रयत्न करावेत, कारण प्रयत्नशील व्यक्तीच खऱ्या अर्थाने विजेते असतात.’
काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, ‘ खेळातून एक मनोभावना तयार होते. राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणारा हा खेळ आहे. या खेळातून परस्परांचा परिचय होतो, एक नवीन नातं तयार होतं. हरलेल्यांच्या त्यागामुळे जिंकलेल्यांचा विजय होतो.’ समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले. यशोवर्धन बारामतीकर यांनी आभार मानले. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. देवेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, गुंडोपंत वड, गुरुनाथ पांगम, विवेक शेट्ये, निशांत पाटील, अलका शेट्ये, सुजित पाटील, प्रसाद नेवरेकर, रेगिना सातवेकर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी व क्रीडा विभाग यांनी परिश्रम घेतले.