कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंगसाठी ! धनंजय महाडिकांची सहकार्याची ग्वाही !!
schedule11 Nov 25 person by visibility 20 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी तसेच खेळाडूंना खेळासाठी लागणार्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासन, खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. त्यासाठी कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पाठपुरावा करावा, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संसद खेल महोत्सवांतर्गत कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत कोल्हापूर, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कागल, मुरगूड या परिसरातील सुमारे १४० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्यावतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. बॉक्सिंग स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि या खेळात प्रावीण्य मिळवून, शासकीय सेवेत भरती झालेल्या खेळाडूंचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनकडे १ हजार मुले प्रशिक्षण घेत आहेत. खेळाडू घडवण्यासाठी कोल्हापूर शहरात चांगली बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारणे गरजेचे आहे, अशी मागणी मनोज घाटगे आणि उमेश पाटील यांनी केली. यावर बोलताना खासदार महाडिक यांनी कोल्हापुरातील उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅाक्सिंग रिंग आणि हॉलसह विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून त्यांना बॉक्सिंगचे धडे देण्यासाठीही पुढाकार घेऊ, अशी ग्वाही दिली. १२, १४, १७ आणि १९ वर्षाखालील ४ गटात अत्यंत चुरशीने बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते झाला. विजेत्या खेळाडूंना चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे नियोजन कोल्हापूर सिटी ऍमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनच्या सचिव आरती कामटे आणि मनोहर घाटगे यांनी केले. पंच म्हणून प्रशांत मोठे, महादेव कदम, गौरव जाधव, स्तवन सोरटे, यशवंत हिरुर, भरत सलगरे, सम्राट फराकटे यांनी काम पाहीले.