76 जनावरे, रोज 300 लिटर दूध पुरवठा ! टाकळीवाडीच्या सुप्रिया चव्हाण ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला दूध उत्पादक
schedule10 Nov 25 person by visibility 26 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग), गोवा डेअरी,सुमुल डेअरी आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने “गोव्यातील दुग्धव्यवसाय व त्यातील संधी आणि आव्हाने या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद डोना पावला गोवा येथील एन.आय.ओ. सभागृहात झाले.
या परिसंवादात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या दुध उत्पादक सभासद सुप्रिया अतिकांत चव्हाण यांना “महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला दूध उत्पादक २०२५” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा गौरव केला. चव्हाण या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावच्या आहेत. गाय ,म्हैस, लहान वासरे असा त्यांच्या ७६ जनावरांचा अत्याधुनिक पध्दतीचा गोठा आहे . त्या रेणुका दुध संस्थेच्या माध्यमातून प्रतिदिन ३०० लिटर दुध पुरवठा गोकुळाला करत आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धन मंत्री नीलकंठ हलर्णकर, पशुसंवर्धन मंत्री पराग नागरसेनकर, डॉ. आर. एस. सोधी डॉ. जे. बी. प्रजापती ,नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दुध संघ , गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके ,डॉ. अमित व्यास. तसेच गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते. गोव्याचे मंत्री पराग नागरसेनकर यांनी सांगितले की, “गोकुळ दूध संघ हा देशातील एक अग्रगण्य दुध संघ असून गोव्यातील दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोकुळचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे." गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघाने नेहमीच दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी विविध राज्यांतील दूध उत्पादक, अधिकारी आणि शासकीय प्रतिनिधींना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे.गोवा राज्यात दुग्धविकास अधिक वेगाने व्हावा यासाठी गोकुळचे सहकार्य कायम राहील. गोव्यामध्ये गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.सुप्रिया चव्हाण यांना मिळालेला ‘सर्वोत्तम महिला दूध उत्पादक पुरस्कार’ हा केवळ त्यांच्या मेहनतीचा सन्मान नसून गोकुळ परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या यशातून अनेक महिला शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असे मनोगत व्यक्त केले.