
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाची आणि धक्काबुक्कीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मागविला आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील अधीक्षक उदय सरनाईक यांनी, शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस काढून रविवारी (ता.१८ सप्टेंबर ) रोजी बँकेच्या वार्षिक सभेतील धक्काबुक्की, गोंधळाचा अहवाल तसेच सभेतील कार्यवृत्तांतचा अहवाल, व्हिडीओ चित्रीकरण तत्काळ सादर करावेत असे कळविले आहे.
शिक्षक बँकेची रविवारी वार्षिक सभा झाली. बँकेत तेरा वर्षांनी सत्ताबदल झाला आहे. विद्यमान संचालक मंडळाने, मागील संचालक मंडळाच्या कामकाजाचा पाढा वाचला तसेच मागील संचालक मंडळाने दाखविलेला दोन कोटी ३८ लाख रुपयांचा नफा खोटा असल्याचे सांगितले. त्याला माजी संचालकांनी जोरदार आक्षेप घेत नफा खोटा असेल तर लेखापरीक्षकांनी त्याला परवानगी कशी दिली ? बँकेला ऑडिटमध्ये अ वर्ग कसा मिळाला असा प्रतिप्रश्न केला. यासह अन्य प्रश्नावरुन सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या समर्थकांत गोंधळ झाला. धक्काबुक्कीचा प्रकारही घडला आहे.