स्वप्नं पूर्ण झाले ! थेट पाइपलाइनचे पाणी कोल्हापुरात पोहोचले!!
schedule10 Nov 23 person by visibility 861 categoryमहानगरपालिका

आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश, आमदार, माजी नगरसेवकांचा पुईखडी येथे आनंदोत्सव
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरवासियांच्या जिव्हाळयाची आणि गेली अनेक वर्षे स्वप्नं असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना अखेर पूर्णत्वास आली. पाईपलाइन योजनेच्या कामाच्या शुभारंभापासून गेल्या दहा वर्षात प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि विविध वळणे पार करत अखेर ही योजना प्रवाहित झाली. शुक्रवारी (१० नोव्हेंबर) रात्री, अकरा वाजण्याच्या सुमारास पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणी पोहोचताच साऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या दृष्टीने ही योजना महत्वाकांक्षी होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव व माजी नगरसेवकांनी पुईखडी येथे हा जाऊन हा आनंदोत्सव साजरा केला. पाण्याचे पूजन केले.
आमदार सतेज पाटील यांनी २०१० मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात थेट पाइपलाइन योजना मंजूर झाली नाही तर आमदारकीची निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली होती. २०१४ मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारच्या कालावधीत या योजनेला मंजुरी मिळाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हा प्रकल्प साकारला. तब्बल ४८५ कोटी रुपयांची ही योजना आहे. कोल्हापूर शहराच्या २०४५ मधील लोकसंख्या गृहित धरुन ही योजना आखली आहे. ५२ किलोमीटर लांबीची ही पाइपलाइन योजना आहे.
कोल्हापूर शहराला शुद्ध व मुबलक स्वरुपात पाणी मिळावे यासाठी कोल्हापूरकर जवळपास पाच दशके संघर्ष करत आहेत. थेट पाइपलाइन योजनेसाठी लढे झाले. मोर्चा, आंदोलने करण्यात आली. ऑगस्ट २०१४ मध्ये थेट पाइपलाइन योजनेच्या कामाला शुभारंभ झाला. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कामाचा शुभारंभ झाला. जीकेसी इन्फ्रास्ट्रकक्चर या कंपनीला हे काम सोपविले होते. २७ महिन्यात काम पूर्ण करणे आणि तीन महिने चाचणी असा करार झाला होता. मात्र परवानग्या, तांत्रिक बाबी यावरुन योजनेला विलंब होत गेला. योजनेतील भ्रष्टाचारावरुन महापालिका सभागृहही गाजले. विविध वळणे पार करत ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी लागला. या योजनेवरुन श्रेयवादही रंगला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाज या साऱ्याच पक्षांनी निधीसाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला.
राज्यात नव्याने सत्तेची समीकरणे झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या कामाचे श्रेय दिले. तसेच दिवाळीत थेट पाइपलाइनने पाणी कोल्हापुरात येणार असे म्हटले होते. मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे वारंवार थेट पाइपलाइन योजनेचे पाणी लवकरच येणार असा सांगत होते. मात्र प्रत्येकवेळी काही अडथळे निर्माण होत होते. यामुळे थेट पाइपलाइन योजनेवरुन श्रेयवादाचे राजकारणही रंगले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘आपणही थेट पाइपलाइन योजनेसाठी विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन केले होते. तसेच सरकारच्या माध्यमातून निधीसाठी पाठपुरावा केला होता’असे सांगत श्रेयवादावरुन टोला लगाविला होता.